'दयावान' काळाच्या पडद्याआड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन

विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन
मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (वय 70) यांची गुरुवारी (ता. 27) सकाळी खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. कर्करोगामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

गिरगाव येथील एका खासगी रुग्णालयात विनोद खन्ना यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत अधूनमधून सुधारणाही होत होती. मध्यंतरी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्यांची प्रकृती पूर्णपणे खालावल्याचे स्पष्ट दिसत होते. अभिनेता सलमान खानने रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र, हळूहळू त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर, गुरुवारी सकाळी 11.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. देखणा, रुबाबदार अभिनेता हरपला, अशा शब्दांत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी रुग्णालय आणि त्यांच्या घरी धाव घेतली. काहींनी स्मशानभूमीत अंत्यदर्शन घेतले.

अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी "जमीर', "परवरीश', "हेराफेरी', "खूनपसीना', "अमर अकबर ऍन्थोनी' व "मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटांत एकत्र काम केले होते. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतेच; पण त्यांच्यातील मैत्री घट्ट होती. आपल्या मित्राच्या निधनाचे वृत्त समजताच अमिताभ यांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. गीतकार गुलजार, अभिनेते ऋषी कपूर, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ, रणधीर कपूर, कबीर बेदी, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, दिग्दर्शक सुभाष घई, रमेश सिप्पी, किरण जुनेजा, रमेश तौरानी, दर्शन जरीवाला, अभिनेत्री दिया मिर्झा आदी बॉलीवूडमधील कलाकारांसह राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे अरविंद सावंत, कॉंग्रेसचे संजय निरूपम आदींनी स्मशानभूमीत विनोद खन्ना यांचे अंत्यदर्शन घेतले.

पेशावर येथे जन्मलेल्या विनोद खन्ना यांचे कुटुंबीय फाळणीनंतर मुंबईत दाखल झाले. "मन का मीत'द्वारे विनोद खन्ना यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. सुरवातीला त्यांनी काही चित्रपटांत खलनायक साकारला. 1971 मध्ये "हम तुम और वो' या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली आणि त्यानंतर त्यांचा खलनायक ते नायक असा प्रवास सुरू झाला. नायक म्हणून यशस्वी घोडदौड सुरू असतानाच अचानक चित्रपटसृष्टीचा संन्यास घेऊन ते ओशो रजनीश यांच्या आश्रमात गेले. सुमारे पाच वर्षे ते कॅमेऱ्यापासून दूर राहिले. 1987 पासून "इन्साफ' या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा पदार्पण केले. नुकताच प्रदर्शित झालेला "एक थी रानी ऐसी भी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 1968 ते 2017 या कालावधीत त्यांनी 144 चित्रपटांत काम केले. भाजपच्या तिकिटावर ते तीन वेळा पंजाबमधील गुरुदासपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांची राजकीय वाटचालही चांगली ठरली.

विनोद खन्ना श्रद्धांजली
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - विनोद खन्ना यांनी विविधांगी भूमिका केल्या. खलनायक, नायक, सहअभिनेता ते चरित्र अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका करताना त्यात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यासोबतच भाजपचे गुरुदासपूरचे खासदार आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. खन्ना यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असणारा कलावंत आपण गमावला आहे.
Web Title: actor vinod khanna passes away