स्वदेसफेम अभिनेत्रीच्या क्रेडिट कार्डचे क्लोनिंग

अनिश पाटील
सोमवार, 22 जुलै 2019

स्वदेश चित्रपटात शाहरूख खानबराेबर झळकलेली अभिनेत्री गायत्री जोशी-ओबेरॉय हिच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरून ४० हजारांचा गैरव्यवहार...

मुंबई : शाहरूख खानच्या गाजलेल्या स्वदेस चित्रपटातील गीता म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री जोशी-ओबेरॉय हिच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरून ४० हजारांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या वेळी गायत्री परदेशात होती. याप्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक तपासणीत पैसे काढण्यात आलेले क्रेडिट कार्ड गायत्रीच्या घरीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

१६ जूनला गायत्रीने तिची स्वीय सहाय्यक युजीनिया नरोनाला संदेश पाठवून तिचे क्रेडिट कार्ड घरी आहे का? हे पाहण्यास सांगितले. मिरा रोडमध्ये राहणाऱ्या नरोनाने तत्काळ जुहूतील गायत्रीच्या घरी जाऊन पाहणी केली असता तिसऱ्या मजल्यावरील नेहमीच्या जागेवर तिला क्रेडिट कार्ड सापडले. तशी माहिती नरोनाने गायत्रीला दिल्यानंतर तिने तिच्या क्रेडिट कार्डमधून ४० हजार रुपयांचे व्यवहार झाले असून ते तिने केले नसल्याचे सांगितले.

गायत्री सध्या परदेशात असल्यामुळे तिने तत्काळ कार्यालयातील कोणाला तरी बॅंकेत जाऊन डिस्पूट फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानुसार बॅंकेत जाऊन फॉर्म भरण्यात आला. त्याच दिवशी नरोनाने जुहू पोलिस ठाण्यात जाऊन सायबर फसवणुकीबद्दल तक्रार दिली. त्यानुसार जुहू पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याखाली तक्रार नोंदवून घेतली आहे. त्यानुसार १० हजार रुपयांचे चार व्यवहार झाले आहेत. त्या संशयित व्यवहारांची माहिती बॅंकेकडे मागितली आहे. ती मिळाल्यानंतर व्यवहार कुठून करण्यात आला आणि त्याचा फायदा कोणाला झाला याची नेमकी माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

असा झाला गैरप्रकार
प्राथमिक तपासानुसार, सर्व प्रकार कार्ड क्‍लोनिंगचा असून कार्डमधील डाटा चोरून त्याच्या सहाय्याने बनावट कार्ड बनवण्यात आले आहे. त्या बनावट कार्डाच्या सहाय्याने व्यवहार करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Gayatri Joshi's credit card cloned... Rs 40,000 fraud In Mumbai