अदानी वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला संघटनांचा विरोध, कामगार उपयुक्तांच्या विरोधानंतरही गुप्त मतदान

तेजस वाघमारे
Sunday, 20 September 2020

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्याने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने संपावर जाण्यासाठी गुप्त मतदान घेतले.

मुंबई, ता. 20 : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्याने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने संपावर जाण्यासाठी गुप्त मतदान घेतले. कोरोनाच्या काळात ग्राहकांना वेठीस धरू नये यासाठी इतर सर्व कामगार संघटनांनी या संपाला विरोध केला आहे. यामुळे संपावरून आता संघटनांमध्येच जुंपणार आहे.

कामगारांच्या प्रश्नांवर संपावर जाण्यासाठी मुंबई ईलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने 12 सप्टेंबर रोजी गुप्त मतदान घेतले. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने, अदाणी आस्थापनात संपासाठी मतदान होणे योग्य नाही. यासाठी आस्थापनातील इतर नोंदणीकृत कामगार संघटनांनी विरोध दर्शविला होता. महाराष्ट्र विद्युत्त जनरल कामगार सेनेने कामगार आयुक्त कार्यालयाला या प्रकरणी पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेऊन, सहाय्यक कामगार आयुक्तांनी मुंबई ईलेक्ट्रिक वर्कर्स युनियन बरोबर 11 सप्टेंबर रोजी ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा प्रत्यक्ष व्हावी अशी विनंती युनियन सरचिटणीस गायकवाड यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे ऑनलाईन सभा रद्द करुन, सामाजिक अंतर राखून 3 ते 4 पदाधिकार्‍यांची बैठक 18 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, त्यासाठी 10 सप्टेंबर रोजी दिलेले ऑनलाईन सभेचे पत्र रद्द करण्यात येत आहे असे कळविले होते.

मोठी बातमी : देवेन भारतींना अद्याप नेमणूक नाही, अठरा पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

त्यामुळे अदानी ईलेक्ट्रिसिटी कंपनीत गुप्त मतदान घ्या असे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त यांनी न दिल्याने 12 सप्टेंबर रोजी गायकवाड यांनी घेतलेली गुप्त मतदान प्रक्रिया बेकायदेशीर ठरविली आहे, असे अदानी ईलेक्ट्रिक विद्युत कामगार सेनेचे नेते गजानन रेवडेकर यांनी सांगितले. या बेकायदेशीर संपाला इतर संघटनांचा विरोध असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कामगारांना बाधा होण्याची शक्यता व्यक्त करत संघटनेने मतदान घेऊ नये, अशा सूचना कामगार उपयुक्तांनी दिल्या. यानंतरही संघटनेने गुप्त मतदान घेतले. याबाबत मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे नेते विठ्ठल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर व्यवस्थापन तोडगा काढत नसल्याने सरकारने जारी केलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून मतदान घेतले असल्याचे सांगितले.

मोठी बातमी :  आठवड्यात दुसऱ्यांदा शिवसेनेने दुसऱ्यांदा केलं मोदी सरकारच्या विधेयकांचे स्वागत

कामगारांनी मॅनेजमेंट विरोधात कौल दिला असून 95.62 टक्के कामगारांनी संपाचे समर्थन केले आहे. त्यानुसार कामगार आयुक्तांना नोटीस बजावून 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही कोणताही तोडगा न काढल्यास 8 ऑक्टोबरपासून संपावर जाणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

adani electricity workers union secret voting stick amid lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adani electricity workers union secret voting stick amid lockdown