व्यसने म्हणजे मानसिक आजारांचे प्रवेशद्वार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - महाविद्यालयीन तरुणांमध्ये हल्ली वाढत असलेले भांग, चरस, गांजा आदींचे फॅड त्यांना निरुपद्रवी वाटत असेल; पण प्रत्यक्षात ते अत्यंत घातक आहे. भविष्यातील मानसिक आजारांचे ते प्रवेशद्वारच ठरते, असे मत विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. मंगळवारी असलेल्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त त्यांनी तरुणांना व्यसनांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. 

मुंबई - महाविद्यालयीन तरुणांमध्ये हल्ली वाढत असलेले भांग, चरस, गांजा आदींचे फॅड त्यांना निरुपद्रवी वाटत असेल; पण प्रत्यक्षात ते अत्यंत घातक आहे. भविष्यातील मानसिक आजारांचे ते प्रवेशद्वारच ठरते, असे मत विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. मंगळवारी असलेल्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त त्यांनी तरुणांना व्यसनांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. 

कॅनाबिस नावाच्या झाडापासून कॅनाबिस घटक वेगळा काढून त्यापासून अमली पदार्थ बनविले जातात. काही देशांमध्ये त्यातील काही पदार्थांचा वापर वैध आहे. त्यापैकी काही घटकांचा वापर भारतात वैद्यकीय वापरासाठी होतो. त्यामुळे असे पदार्थ सुरक्षित असून त्याचे दुष्परिणाम नाहीत, असा गैरसमज आहे. पण अशा व्यसनांचे अत्यंत वाईट परिणाम होतात. त्यामुळे स्क्रिझोफेनिया, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन आदी मानसिक आजार होण्याची शक्‍यता वाढते, असे मुंदडा म्हणाले. 

हल्ली चारपैकी एक तरुण सिगारेट-हुक्कामार्फत अशी व्यसने करत असल्याचे आढळून आले आहे. व्यसनाधीन व्यक्तींमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढते. इतर अधिक घातक अमली पदार्थांचे व्यसन लागते. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील आयुष्याचे वाटोळे होते. अशा स्थितीत मुलांमधील व्यसनाधीनता ओळखून त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी पालकांची आहे, असेही मुंदडा म्हणाले. 

लक्षणे ओळखावीत 
जर आपला मुलगा अत्यंत किरकोळ गोष्टींवरून प्रचंड चिडायला लागला, तो घरी दार बंद करून एकटा बसू लागला, त्याचे डोळे लाल दिसू लागले, त्याची शैक्षणिक हुशारी कमी झाली, त्याची भूक कमी झाली, आवडीच्या गोष्टीही तो खाईनासा झाला आणि विशेष म्हणजे आधीपेक्षा त्याच्या वागण्यात बदल झाला असेल तर त्याला अमली पदार्थांचे व्यसन लागल्याची शक्‍यता आहे. किंबहुना हल्ली तर अनेक मुले गंमत म्हणून कधीतरी अशा पदार्थांची नशा करून बघतात. पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असा सल्ला डॉ. सागर मुंदडा यांनी दिला. 

उपाययोजना 
आपल्या मुलामध्ये अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी आकांडतांडव करू नये किंवा अति कठोर वागू नये. त्याला विश्‍वासात घेऊन त्याने असे पदार्थ घेतलेत का याची खात्री करा. त्याने मान्य केले तर त्याला शांतपणे व्यसने कशी वाईट आहेत ते सांगा. व्यसनांच्या दुष्परिणामांची त्याला माहिती द्या. त्याने मान्य केले नाही तर त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे न्या. औषधोपचार त्यावरील उत्तर आहे. कठोर भूमिका घेऊन मुलाला घरात डांबणे, कॉलेज बंद करणे किंवा बदलणे, हॉस्टेलमध्ये घालणे असे चुकीचे उपाय न करता मुलावर योग्य उपचार करा, असे डॉ. सागर मुंदडा म्हणाले. 

Web Title: Addiction is the entrance of mental illness