निवडणुकीनंतर आदिती तटकरेंना धक्का?

निवडणुकीनंतर आदिती तटकरेंना धक्का?

निवडणुकीनंतर आदिती तटकरेंना धक्का?
अलिबाग : आघाडीच्या धोरणानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. परंतु त्यानंतरही त्या या पदावर कायम असून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जय-पराजयानंतर अध्यक्षपदावर कोण राहणार, याबाबतची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. आघाडीच्या उमेदवारास दगाफटका झाल्यास जिल्हा परिषदेमधील आघाडीच्या सत्ता समीरकरणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष नेहमीच जीवाचे रान करत आला आहे. यासाठी कधी शिवसेनेशी हातमिळवणी; तर कधी राष्ट्रवादीशी जवळिक 
साधून या पक्षाने जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून येथील राजकारण सतत खदखदत असते. अशीच खदखद सध्या 
सुरू असून विधानसभा निवडणुकीचे निकाल आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने न लागल्यास ही खदखद पुन्हा उफाळून येऊ शकते. 

यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असल्याने आता याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीचे नेतेमंडळी खबरदारी घेत आहेत. प्रचारादरम्यान प्रत्येक नेत्याला दिलेली जबाबदारी चोखपणे निभावत आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर आपल्या डोक्‍यावर फोडले जाऊऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

दगाफटक्‍याचा इतिहास 
2002 मध्ये राष्ट्रवादी आणि शेकापने जिल्हा परिषदेत युती करण्याचे ठरविले होते. परंतु राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अचानक उठाव करत शिवसेनेशी संधान साधत अपेक्षा कारेकर यांना अध्यक्ष; तर भाई पाशीलकर यांना उपाध्यक्ष केले होते. याच वेळेस शेकाप पाच आमदारांसह राज्यामध्ये सत्तेत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे शेकापने सत्तेतून बाहेर पडत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर शेकापने तीन मंत्रिपदावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाणी सोडले होते. 

निवडणुका झाल्यावर जिल्ह्यातील आघाडीची नेतेमंडळी एकत्र येत अध्यक्षपदाचा निर्णय घेणार आहेत. यामध्ये सर्वांचे विचार, सूचना गृहीत धरल्या जाणार असून सर्वानुमते नवा अध्यक्ष निवडला जाईल. 
- खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

जिल्हा परिषदेतील पक्षीय स्थिती 
शेकाप- 23 
राष्ट्रवादी कॉंग्रेस- 12 
शिवसेना- 18 
कॉंग्रेस- 3 
भाजप- 3 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com