Aditya Birla : भारताचा विकास कायम राहील; आदित्य बिर्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Birla statement India development will continue Strong central leadership economic reforms youth population

Aditya Birla : भारताचा विकास कायम राहील; आदित्य बिर्ला

मुंबई : आर्थिक सुधारणा आणणारे समर्थ केंद्रीय नेतृत्व, तरुणांची मोठी लोकसंख्या घरगुती उत्पादनात मोठी वाढ आणि डिजिटायझेशन या कारणांमुळे येती काही दशके भारताचा विकास वेगाने होईल असे मत आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसी तर्फे आज येथे व्यक्त करण्यात आले.

नव्या वर्षाचा आढावा घेताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए. बालसुब्रमणियन तसेच सी.आय.ओ. महेश पाटील यांनी ही माहिती दिली. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचे स्थान कायम राहील, असेही ते म्हणाले.

व्याजदरवाढीचे सत्र थांबले की शेअर बाजारातही सुधारणा होईल. यावर्षात विकसित देशांच्या शेअर बाजारांच्या तुलनेत उदयोन्मुख देशांचे शेअर बाजार वेगाने वाढतील. कच्च्या तेलाचे भाव पिंपामागे ९० ते १०० डॉलर दरम्यान राहतील. मात्र ते शंभरच्या वर गेले तर आपल्या अर्थव्यवस्थेतील अडचणी वाढतील असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

गेली सात वर्षे आर्थिक सुधारणा आणणारे समर्थ नेतृत्व केंद्रात असल्याचा फायदा अर्थव्यवस्थेला मिळत असून अनेक क्षेत्रांची मोठी वाढ झाली आहे. देशात काम करणाऱ्या तरुणांची मोठी संख्या असल्याने त्याचा फायदा आपल्याला पुढील वीस वर्षे मिळेल.

जागतिक उद्योग चीन मधून बाहेर पडत असल्याचा फायदाही आपल्याला मिळून आपण जगाचे पुरवठादार होऊ शकतो. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना तसेच संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांमधील वाढ व डिजिटायझेशन यामुळे आपल्या देशाची प्रगती कायम राहील. सन २०३० मध्ये आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ असेही पाटील म्हणाले.

या वर्षभरात अमेरिकेची वाढ कमी होईल. वर्षअखेरीला त्यांची चलनवाढ घटू लागेल तसेच या वर्षात डॉलरचे भावही पडण्याची शक्यता आहे. जगाचा विकास २.३ टक्क्यांच्या आसपास होईल, हा दर कोरोनापूर्वकाळापेक्षाही कमी असेल. यावर्षी भारततात बँका, वाहन निर्मिती कंपन्या व पायाभूत सुविधांच्या कंपन्यांच्या शेअरची कामगिरी चांगली होईल. येत्या दोन ते तीन वर्षात शेअर बाजारातून १२ टक्के परतावा मिळणे सहज शक्य आहे असेही बालसुब्रमणियन म्हणाले.

भारतात अजूनही मागणी कमीच आहे. या अर्थसंकल्पात विविध अनुदाने कमी झाली तर ते पैसे उपलब्ध होऊन चालू खात्यावरील तूट कमी होईल. केंद्राने आपला भांडवली खर्च वाढवला आहे पण तो गेल्या दहा वर्षांइतकाच आहे. खाजगी कंपन्या मात्र जागतिक परिस्थिती सुधारण्याची तसेच देशांतर्गत खप कधी वाढेल याची वाट बघत आहेत. त्यामुळे खप वाढविण्यावर अर्थसंकल्पात भर हवा. यावर्षी आपली चलनवाढही कमी होईल असेही आज सांगण्यात आले.