प्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध

प्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध

तुर्भे - वाशीतील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोणतीही चौकशी न करता निलंबन व राजीनामा दिलेल्या डॉक्‍टरांचा वाद मिटला नसल्याने अजूनही हे डॉक्‍टर कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे काल गुरुवारी (ता. ९) रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून  काही काळ काम बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला.

वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना विकी इंगळे या रुग्णाचा मागील महिन्यात मृत्यू झाला. डॉक्‍टरांच्या हलगर्जीने हा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. तसेच डॉक्‍टरांवर कारवाईची मागणी केली. प्रशासनाने रुग्णालयातील दोन डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई केली; मात्र ही कारवाई चुकीची असून ती मागे घ्यावी, अशी मागणी करत रुग्णालयातील इतर निवासी डॉक्‍टरांनीही राजीनामे देऊन काम बंद केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील आरोग्य सुविधा कोलमडली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. काही रुग्णही इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत.

रुग्णालयाची ही स्थिती पाहता आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप केला. सर्व डॉक्‍टरांशी संपर्क साधून दुसऱ्या डॉक्‍टरांची व्यवस्था होईपर्यंत तरी रुग्णालयात हजर होण्याचे आवाहन केले. त्यानुसार हे डॉक्‍टर रुग्णालयात हजर होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. राजीनामे दिलेले डॉक्‍टर कामावर हजर न झाल्याने आरोग्यसेवा सुरळीत होऊ शकल्या नाही. याशिवाय जे डॉक्‍टर सोडून गेले आहेत, त्यांच्या जागेवर इतर डॉक्‍टरांची निवड अद्याप करण्यात आलेली नाही.एकीकडे ही स्थिती असतानाही रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचारी मिळून काही विभाग चालवत आहेत. त्यात प्रसूती विभाग, डायलिसिस विभाग सुरू आहेत. डॉक्‍टरांची कमतरता असताना या सुविधा देताना कोणती अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रुग्णालयात औषध साठाही संपुष्टात आल्याने सुरू असलेल्या विभागात उपचार कसे देणार, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

डॉक्‍टरांचे निलंबन व राजीनाम्यांनंतर उपस्थित डॉक्‍टरांवर कामाचा ताण वाढला आहे. रुग्णालयात औषधे व उपकरणांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अथवा दगावल्यास त्याचा फटका डॉक्‍टरांना बसतो. याला प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध काळ्या फिती लावून करण्यात आला; मात्र या वेळी रुग्णांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली.
- डॉ. राजेश म्हात्रे,पालिका रुग्णालय, वाशी

डॉक्‍टरांनी संप पुकारला नसून निषेध व्यक्त केला. ज्या ठिकाणी डॉक्‍टरांची कमतरता आहे, त्या ठिकाणी निवड केली आहे. इतर डॉक्‍टर भरती केले जाणार आहेत. बाह्य कक्ष विभाग (ओपीडी) सुरू आहेत.
- दयानंद कटके,  मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com