ध्वनिप्रदूषणाबाबत प्रशासन अनभिज्ञ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नागरिकांनी बिनआवाजी फटाक्‍यांना दिलेले प्राधान्य आणि आवाजी फटाक्‍यांवर आलेले निर्बंध यामुळे नवी मुंबईत दिवाळीच्या दिवसांत ध्वनिप्रदूषण कमी झाले, असा दावा करण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात किती ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली, याचा तपशील कोणत्याही सरकारी यंत्रणांकडून मिळू शकला नाही.

नवी मुंबई : नागरिकांनी बिनआवाजी फटाक्‍यांना दिलेले प्राधान्य आणि आवाजी फटाक्‍यांवर आलेले निर्बंध यामुळे नवी मुंबईत दिवाळीच्या दिवसांत ध्वनिप्रदूषण कमी झाले, असा दावा करण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात किती ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली, याचा तपशील कोणत्याही सरकारी यंत्रणांकडून मिळू शकला नाही. एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका ही जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगत आहेत; तर दुसरीकडे ‘तक्रार आल्यावरच संबंधित ठिकाणी ध्वनिप्रदूषण मोजले जाते’ असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी सक्रिय असलेल्या सामाजिक संस्थाही कार्यरत नसल्याने ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीच्या अतिउत्साहामध्ये रात्री उशिरापर्यंत फटाक्‍यांची आतषबाजी सुरू असते. त्यातही आवाजी फटाके उडवण्याकडे नागरिकांचा कल अधिक असतो. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना होतो. यंदा मात्र नागरिकांनी कमी आवाजी फटाक्‍यांना प्राधान्य दिल्याने शहरात ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी नोंदवण्यात आली. तसेच ध्वनिप्रदूषणाबाबत आपल्याकडे एकाही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने रात्री १० नंतर फटाके वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरात लक्ष्मी पूजन (ता. २७), भाऊबीजेच्या  (ता.२९) दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. बहुतांश ठिकाणी रात्री १० नंतरही फटाके वाजवले जात होते. शांतता क्षेत्र असलेल्या परिसरातही कानठळे बसत होते; मात्र वर्षांतून एकदाच दिवाळी येत असल्याने कारवाईबाबत प्रशासनदेखील ढिम्म असल्याचे पालिका प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशासनाकडून टोलवाटोलवी
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ध्वनिप्रदूषणाबाबत एखादी तक्रार आली की त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली जाते. त्यावर पोलिसांमार्फत कारवाई होते. याबाबत परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित ठिकाणचे रिडिंग घेतो. त्यानंतर ध्वनिप्रदूषण आढळल्यास कारवाई करतो. या तीन दिवसांत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही. डहाणे यांच्याकडे ध्वनिप्रदूषण किती नोंदवले गेले, याची आकडेवारी मागितली असता, ती अद्याप उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले; तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांनीदेखील कालच दिवाळी संपल्याने ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी आपल्याकडे अजून आली नसल्याचे सांगितले.

एखाद्या ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करताना कानठळी बसत असल्यास त्याबाबत तक्रार केली जाते; मात्र त्या ठिकाणी पोलिस येईपर्यंत तेथील आतषबाजी कमी झालेली असते वा त्या ठिकाणाहून फटाके वाजवणारे निघून गेलेले असतात. अशा वेळी कारवाई कशी होणार? तक्रार करूनही त्याचा फायदा होत नाही.
- अजय मराठे, ध्वनिप्रदूषणविरोधी कार्यकर्ते, वाशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration unaware of noise pollution