प्रशासकीय अधिकारी ते साहित्यिक; नीला सत्यनारायण यांचा असा होता जीवनपट

प्रशांत बारसिंग - सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 16 July 2020

नीला सत्यनारायण उत्तम प्रशासकीय अधिकारी सोबतच मराठी साहित्यिकही होत्या.

मुंबई - निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळं निधन झाले. नीला उत्तम प्रशासकीय अधिकारी सोबतच मराठी साहित्यिकही होत्या. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होत. ते पोलीस खात्यात होते.

वाचा - नेट सेट नसलेल्या प्राध्यपकांसाठी मोठी बातमी; मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश

नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या १९६५ साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. १९७२ साली त्या आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्या.

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.

वाचा- राजस्थानच्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात, या काँग्रेसच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी होणार?

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.

पुस्तके 

 • आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
 • आयुष्य जगताना
 • एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
 • एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर)
 • ओळखीची वाट (कवितासंग्रह)
 • जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
 • टाकीचे घाव
 • डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
 • तिढा (कादंबरी)
 • तुझ्याविना (कादंबरी)
 • पुनर्भेट (अनुभवकथन)
 • मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
 • मैत्र (ललित लेख)
 • रात्र वणव्याची (कादंबरी)
 • सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन) 

------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrative officer to literary; This was the biography of Neela Satyanarayan