SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश, आजपासून प्रवेश प्रक्रिया

तेजस वाघमारे
Thursday, 26 November 2020

अखेर राज्य सरकारने तोडगा काढला असून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा मराठा नेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे.

मुंबई: राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अकरावी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विद्यापीठातील प्रथम वर्ष अभ्यासक्रम आदी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर अखेर राज्य सरकारने तोडगा काढला असून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा मराठा नेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात दिली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे सर्व स्तरावरून टीका होत होती. यातच मंगळवारी उच्च न्यायालयातही याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. यानुसार राज्य सरकारने अखेर मंगळवारी रात्री शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. 

यानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरीता अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती उठविण्या करीता दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक वाचा-  मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरील ST अपघात; मृत प्रवाशाला १० लाखांची मदत, परिवहन मंत्र्यांची घोषणा

तसेच या याचिकेच्या अंतिम निकालापर्यंत हा निर्णय लागू राहिल. या निर्णयानुसार आता शिक्षण विभागाकडून प्रवेशाची पुढील प्रकिया जाहीर केली जाईल. हा निर्णय राज्याच्या महाधिवक्त्यांनी दिलेल्या कायदेशीर अभिप्राय विचारात घेऊन घेण्यात आल्याचेही याच स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अकरावीबरोबरच इंजिनिअरिंग, औषध निर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला आहे. मात्र मराठा समाजातून या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर आहे.
 
न्यायालयीन लढाईचा पर्याय

प्रवेशाबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली. याबाबत नव्याने कायदेशीर लढाई लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 12 टक्क्याप्रमाणे सर्व महाविद्यालयात व्यवस्थापन कोटा ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, सुपर नुमररी कोटा, विद्यार्थ्यांना शुल्कात 100 टक्के सवलत देणे असे पर्याय दिले होते. मात्र याचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतेय असेही पाटील म्हणाले.
 
अकरावी प्रवेश वेळापत्रक जाहीर, आजपासून प्रवेश प्रक्रिया

शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही फेरी 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही फेरी 10 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. दुसरी गुणवत्ता यादी 5 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. https://mumbai.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी भेट द्यावी.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • 26 नोव्हेंबर - सकाळी 10 वाजता- नियमित प्रवेश फेरी - 2 साठी रिक्त पदे जाहीर करणे
  • 26 नोव्हेंबर - सायंकाळी 5 ते 1 डिसेंबर रात्री 11.55 वाजेपर्यंत - 

यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर लागू होणारा प्रवर्ग निवडण्याची सुविधा.
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भाग 1 मध्ये आवश्यकता असल्यास बदल करणे आणि दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवणी. (यापूर्वी भरलेल्या भाग 2 मधील पसंतीक्रम बदलता येतील.
या कालावधीत नवीन विद्यार्थी भाग 1 आणि 2 भरू शकतील.

  • 2 डिसेंबर - सायंकाळी 5 वाजेपर्यंत - प्रवेश अर्ज भाग 1 ची पडताळणी करणे.
  • 3 आणि 4 डिसेंबर - डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ
  • 5 डिसेंबर - दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
  • 5 डिसेंबर सकाळी 11.30 ते 9 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत - मिळालेला प्रवेश निश्चित करणे.
  • 9 डिसेंबर - सायंकाळी 8 वाजेपर्यंत - झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदवण्यासाठी ज्युनिअर महाविद्यालयाना अतिरिक्त वेळ.
  • 10 डिसेंबर - प्रवेशाची नियमित फेरी 3 साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Admission SEBC category students from open category admission process from today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission SEBC category students from open category admission process from today