ऐन सणासुदीत डोंबिवलीतून भेसळयुक्त तूप जप्त, पाच जणांना बेड्या 

शर्मिला वाळुंज
Friday, 23 October 2020

ठाणे : भेसळयुक्त तूप तयार करून नामांकित कंपनीच्या नावाखाली त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (ता. 21) डोंबिवलीतून अटक केली. डोंबिवलीतील एका  गोदामातील बनावट तुपाची विक्री ठाणे जिल्ह्याप्रमाणे मुंबई, नवी मुंबई परिसरातही होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यात सहभागी व्यापाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

ठाणे : भेसळयुक्त तूप तयार करून नामांकित कंपनीच्या नावाखाली त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (ता. 21) डोंबिवलीतून अटक केली. डोंबिवलीतील या गोदामात बनावट तुपाची विक्री ठाणे जिल्ह्याप्रमाणे मुंबई, नवी मुंबई परिसरातही होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यात सहभागी व्यापाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

अधिक वाचा : लोकल सुरू होऊनही महिलांचे हाल, तिकिटासाठी तासभर रांगेत

अल्पेश गोरे (36, डोंबिवली), जिमित गठाणी (33, ठाणे), सौद शेख (32, मिरा रोड), धनराज मेहता (62, भाईंदर), चंद्रेश मिराणी (50, दहिसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 89 हजार रुपये किमतीचे एकूण 168 लिटर बनावट तूप हस्तगत केले असून, दहिसर येथील गोविंद सिंग व पारस या आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

ऐन सणासुदीच्या काळात डोंबिवलीतील एका गोदामातून बनावट तसेच भेसळयुक्त तूप तयार करून अमूल, गोवर्धन, कृष्णा, सागर कंपनीच्या पिशव्यांमध्ये पॅक करून त्यांची बाजारात सर्रास विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, शरद पंजे, मारुती दिघे यांच्या पथकाने डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली रोड येथील पार्वती निवासमधील एका घरातील गोदामात छापा टाकला. यावेळी गोदामातून 168 लिटर बनावट तूप, लायन वनस्पती डालडा 15 किलोचे 14 डब्बे, सोया लाईट तेल 15 किलोचे 15 डबे, 10 किलो तयार केलेले बनावट तूप, नामांकित कंपनीच्या पिशव्या, सिलिंग मशीन, इतर साहित्य व आरोपींचे मोबाईल असा एकूण 1 लाख 89 हजार 700 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : मदतीपासून वंचित ठेवणार नाही; ठाण्याच्या पालकमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

...अशी केली जात होती विक्री
आरोपींमधील चंद्रेश मिराणी याने गोविंद सिंग याच्या मदतीने डालडा व तेल यांचे मिश्रण तयार करून त्यामध्ये आर्टीफिशीयल तूप फ्लेवर टाकून बनावट तूप तयार करत होते. यानंतर पारस याच्याकडून अमूल, गोवर्धन, कृष्णा व सागर या नामांकित कंपनीच्या बनावट पिशव्या विकत घेऊन त्यामध्ये तूप भरून ते सदर कंपनीचे असल्याचे भासविले जात होते. धनराज मेहता याला ते विक्रीकरिता देण्यात येत होते. अशाप्रकारे ग्राहकांनी या बनावट तुपाची मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केली. तर अल्पेश, जिमित व सौद यांनीही एकमेकांकडून बनावट तूप खरेदी करून ग्राहकांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adulterated ghee seized from Dombivali, 5 arrested