तब्बल ३० वर्षांनी चोरीचा ऐवज परत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

कर्जत येथील लोहमार्ग पोलिसांनी तब्बल ३० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोन्याची चेन परत केली आहे.

नेरळ (बातमीदार) ः कर्जत येथील लोहमार्ग पोलिसांनी तब्बल ३० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोन्याची चेन परत केली आहे. दरम्यान, तब्बल ३० वर्षांनी चोरीचा ऐवज परत केल्याने कर्जत लोहमार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.

लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पोलिस ठाण्यात वर्षानुवर्षे जमा असलेला मुद्देमाल ज्या प्रवाशांचा असेल त्यांना कायदेशीर पूर्तता करून परत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे जीआरपींनी याबाबतची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार कित्येक वर्षांपासून कर्जत जीआरपींकडे जमा असलेला चोरीचा मुद्देमाल फिर्यादींना सोपविला. आतापर्यंत सुमारे शंभरच्या वर प्रवाशांना त्यांचा चोरीस गेलेला ऐवज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन परत केला.

अशीच एक चोरीची घटना ३१ सप्टेंबर १९८९ रोजी घडली होती. शेलू येथील महिला तारामती हरिचंद्र मसणे आपल्या तीन मुलांसह लोकलने प्रवास करत असताना त्यांच्या आठ वर्षीय मुलाची सोनसाखळी गाडीतून उतरत असताना एका महिलेने हिसकावून पळ काढला. मुलाची साखळी चोरल्याचे लक्षात आल्यावर तारामती मसणे यांनी रेल्वे जीआरपींकडे तक्रार केली. कायदेशीर पूर्तता होईपर्यंत बराचसा वेळ निघून गेल्याने तारामती मसणे यांनी चोरीला गेलेली सोनसाखळी पुन्हा मिळेल याची आशा सोडली होती; परंतु रेल्वे जीआरपी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे चोरीला गेलेली साखळी फिर्यादी महिलेस परत मिळाली आहे. रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जीआरपीचे पाटील व स्वप्नील मसणे यांनी कायदेशीर तपास पूर्ण करून ऐवज सुपूर्द केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after 30 yrs got lost things