अपघातानंतरही उमटले सुरेल जीवनगाणे! 

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

अपघातानंतर अंथरुणाला खिळलेल्या राहुल साळवेने लिहिलेली गाणी आज त्याला मराठी चित्रपत्रसृष्टीतील उदयोन्मुख गीतकार म्हणून ओळख देऊन गेली... 

अपघातानंतर अंथरुणाला खिळलेल्या राहुल साळवेने लिहिलेली गाणी आज त्याला मराठी चित्रपत्रसृष्टीतील उदयोन्मुख गीतकार म्हणून ओळख देऊन गेली... 
मुंबई :  "शिनमा', "कॉपी' आदी चित्रपटांसाठी गीतलेखन करून प्रकाशझोतात आलेल्या राहुल साळवेकडे मराठी चित्रपटसृष्टीतील एक उदयोन्मुख गीतकार म्हणून पाहिले जात आहे. गीतांबरोबरच राहुल आता कथालेखनाकडेही वळला आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर जग जिंकता येते याची प्रचीती राहुलच्या यशाने येते. सात महिन्यांनंतर राहुल कोमातून बाहेर पडला. सध्या तो अंथरुणाला खिळून आहे. अशा स्थितीतही त्याने अप्रतिम गाणी लिहिली. एवढेच नव्हे, तर मी राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच पटकावणावर, असा आत्मविश्‍वासही त्याला आहे. 
राहुल सिद्धार्थ साळवे वाशीत लहानाचा मोठा झाला. शाळा-महाविद्यालयांत त्याला कविता लिहिण्याची आवड जडली; परंतु पुढे त्याला मर्यादा आल्या. महाविद्यालयीन शिक्षणानंतर तो मारुती सुझुकी कंपनीत कामाला लागला; पण नियतीच्या मनात वेगळेच होते. 2010 मध्ये तो कामावरून परतत असताना मागून येणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली आणि त्याचे आयुष्यच उद्‌ध्वस्त झाले. तेव्हापासून तो आतापर्यंत अंथरुणावर पडून आहे. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर तो सात महिने कोमात होता. आतापर्यंत त्याच्यावर 17 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अजून दोन शस्त्रक्रिया बाकी आहेत. त्या झाल्या की तो पूर्णपणे बरा होईल. राहुल कोमातून बाहेर आल्यानंतर साहजिकच त्याच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. पुढील आयुष्य कसे जगायचे, या विवंचनेने त्याची झोप उडाली. राहुलच्या संग्रहित केलेल्या जुन्या कविता त्याच्या मित्राने त्याला दिल्या. त्या वाचल्यानंतर आपण लिहिले पाहिजे, असा विचार राहुलच्या मनात पक्का झाला आणि त्याने लिहिण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्याचे "ती विरह मी' आणि "रंग गहिरे' हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. काव्यसंग्रहांना मिळालेला प्रतिसाद पाहून राहुलचा आत्मविश्‍वास दुणावला. त्याला वेगळेच अवकाश मोकळे झाले. राहुलच्या अप्रतिम कवितांची भुरळ दयासागर वानखेडे यांना पडली. त्यांनी त्याला चित्रपटात गाणी लिहिण्याची संधी दिली. त्यातूनच दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या "शिनमा'साठी "कल्ला झाला...' हे गाणे त्याने लिहिले. ते लोकप्रिय ठरले. "कॉपी', "भारत आमचाही देश आहे' आणि "डॉ. तात्याराव लहाने' यांच्यावरील चित्रपटांसाठी राहुलने गीतलेखन केले आहे. "कॉपी'ची कथा त्याने व मित्र दयासागर वानखेडे यांनी मिळून लिहिली. त्यातील चार गीते राहुलने लिहिली आहेत. त्यांना रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. "भारत आमचाही देश आहे'साठीही त्याने चार गाणी लिहिली. "डॉ. तात्याराव लहाने'साठी एक गाणे लिहिले आहे. घरी बसून तो मोबाईलवर चित्रपटाची कथा मागवितो आणि त्यानंतर गीते लिहितो. 

कविता लिहिण्याची आवड मला होती. कामामुळे त्याकडे माझे दुर्लक्ष झाले. अपघाताने माझे आयुष्य उद्‌ध्वस्त केले; पण त्यातूनच मला आयुष्य जगण्याची नवी दिशा मिळाली. मी गीतकार व कथालेखक म्हणून घडलो. चित्रपटात गाणी लिहिण्याची संधी मिळाली असून, आता त्याच क्षेत्रात उंच भरारी घ्यायचीय. 
- राहुल साळवे (गीतकार) 
 

Web Title: after accident life song once again