अँटीजेन आणि अँटीबॉडीनंतर आता रुग्णाच्या ध्वनी लहरींवरुन होणार कोरोनाचं निदान, BMC चा नवा प्रयोग...

अँटीजेन आणि अँटीबॉडीनंतर आता रुग्णाच्या ध्वनी लहरींवरुन होणार कोरोनाचं निदान, BMC चा नवा प्रयोग...

मुंबई : अँटीजेन आणि अँटीबॉडी तपासणीनंतर आता रुग्णाच्या ध्वनी लहरींवरुन (आवाजावरुन) कोरोना पाॅझिटीव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते. पालिकेकडून हा नवा प्रयोग केला जाणार आहे. पुढच्या आठवड्यापासून नेस्कोच्या जंबो केअर सेंटरमधिल संशयित आणि कोविड -19 रूग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाईल. या चाचणीमुळे 30 मिनिटांत व्हायरस व्यक्तीच्या शरीरात आहे की नाही याचे निदान होऊ शकेल आणि जे या चाचणीत पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसीआर चाचणीने त्यांचे निदान पक्कं केलं जाईल. 

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन कूपर हॉस्पिटलच्या सहकार्याने 1000 व्यक्तींवर अभ्यास केला जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिने लागतील, असं मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे. 

खरंतर आरटीपीसीआर ही कोविड 19 च्या निदानासाठी सर्वात प्रभावशाली चाचणी आहे. परंतु, याचा अहवाल येण्यासाठी आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्याऐवजी, अँटीजेन चाचणीचा अहवाल 30 मिनिटांत येतो. परंतु, या पद्धतीने चुकीचे अहवाल मिळू शकतात असा ICMR चा दावा आहे.

ही संकल्पना नवीन असली तरी अमेरिका आणि इस्त्राईल सारख्या अनेक देशांमध्ये याचा वापर होत आहे. नायर डेंटल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता आणि नेस्कोचे प्रभारी डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, जेव्हा कोविड-19 ची लक्षणे दिसू लागतात तेव्हा त्या व्यक्तीस श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू लागते ज्यामुळे, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. या सर्व प्रक्रियेत फुप्फुसाच्या स्नायूंवर ही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्याचा परिणाम आवाजावर होऊन तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तो बदल जाणवू लागतो. याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येतं आणि त्यातून त्या व्यक्तीला कोविड 19 झाला आहे की नाही याचे निदान होते. 

एक व्हॉईस अ‍ॅप्लिकेशन किंवा स्मार्ट लॅपटॉपवर घेऊन संशयित रुग्णाने त्या अ‍ॅप्लिकेशनवर काही नंबर बोलायचे. हे आवाजाचे नमुने मुख्य सर्व्हरसह स्वयंचलितपणे संकलित होतील. त्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून 30 सेकंदात अहवाल मिळू शकतो, असे ही डॉ. अंद्राडे यांनी सांगितले. 

हा प्रयोग कोविड-19 च्या संशयित, पॉझिटिव्ह आणि निगेटीव्ह अशा तीन प्रकारच्या लोकांच्या आवाजाचे विश्लेषण करेल. त्यांच्या व्होकल बायोमार्कर्स (व्हीबी) वर अवलंबून त्यांचे निदान केले जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा व्हीबी 0.5 च्या खाली असेल तर ती व्यक्ती कोविड निगेटिव्ह मानली जाईल. मात्र, जर त्यापेक्षा कोणाचा व्हीबी जास्त आला तर त्या व्यक्तीला कोविड 19 चा संशयित म्हणून पुढच्या निदानासाठी आरटी-पीसीआर ही चाचणी करावी लागेल. 

हे तंत्रज्ञान सुरुवातीच्या टप्प्यात असुन प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग आहे. आम्हाला त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. हा अभ्यास संपण्यास 2 ते 3 महिने लागतील. कूपर रुग्णालयाला यावर अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या अभ्यासासाठी त्यांच्या नैतिक समितीकडून अंतिम मान्यता मिळाली की हा अभ्यास सुरु होईल. मान्यता एक-दोन दिवसात मिळण्याची आशा आहे. यामध्ये दोन कॅटेगरीमध्ये, म्हणजेच संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यासाठी एका कंपनीसोबत करार देखील केला जाणार आहे. आवाजाचे नमुने गोळा करुन आर्टीफिशियल इन्टेलिजियन्सद्वारे ते पाठवून त्यानंतर आरटीपीसीआर देखील केलं जाणार आहे. यानंतर दोघांची तुलना केल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहेहे समजू शकणार आहे. यातून 100 टक्के निकाल मिळेलच असे नाही. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती कूपर रुग्णालयात आली नसून नैतिक समिती याबाबतचा निर्णय घेईल असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी सांगितले आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

after antigen and antibody testing bmc to use vocal frequencies to test covid 19 patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com