तब्बल 3 तासांनी मध्य रेल्वेची आसनगाव ते कसारा लोकल सेवा पूर्ववत

रवींद्र खरात
Saturday, 19 September 2020

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवासीवर्गाला लोकल ने प्रवास करण्यास मुभा दिली आहे.

मुंबई : आटगाव रेल्वे स्टेशनजवळ आज (शनिवार) सकाळी 7 वाजून 28 मिनिटाला लोकलचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने आसनगाव ते कसारा दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल तीन तासाने 10 वाजून 38 मिनिटाला ही सेवा पूर्वरत करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. सकाळच्या सत्रात कसाऱ्याहून  मुंबईला जाणाऱ्या सेवेतील प्रवासी वर्गाला मात्र याचा काहीसा मनस्ताप सहन करावा लागला.

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवासीवर्गाला लोकल ने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. दरम्यान आज सकाळी 7 वाजून 28 मिनिटाला मध्य रेल्वेच्या आसनगाववरून आटगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरला. यामुळे तब्बल तीन तास आसनगाव ते कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली होती. सुदैवाने कुठली जीवितहानी अथवा जखमी कोणी झाले नसले तरी अत्यावश्यक सेवेत काम करण्यास निघालेल्या प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले.

हेही वाचा : लोकल ट्रेन्स आणि ST बसच्या मुद्द्यावरून शिवसेना-मनसे आमनेसामने, परबांच्या उत्तरावर देशपांडेंचा प्रतिसवाल

अनेकांनी खासगी आणि एसटी बस मधून प्रवास केला. लोकलच्या डब्यात 8 ते 9 प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला असून अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लोकलचा डबा रेल्वे रुळावरून दूर करण्याचे युद्धपातळीवर काम करत आसनगाव ते कसारा दरम्यानची वाहतूक 10 वाजून 38 मिनिटाला पूर्ववत केली. याबाबतची माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

हेही वाचा :  कंगनाची दोन कोटींची भरपाईची मागणी बोगस, महापालिकेने दाखल केलं प्रतिज्ञापत्र 

प्रवासी संघटनेचा आरोप 

कल्याण ते कसारा रेल्वे प्रवास म्हणजे रामभरोसे असून अनेक वेळा येथे दुरुस्तीचे कामे करा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्यावर रेल्वे प्रशासन लक्ष देत नसून लॉकडाऊन काळात लोकलची मर्यादीत सेवा सुरू असतानाही मध्य रेल्वेचा गलथान कारभार थांबायला तयार नाही. रेल्वे अक्षम्य दुर्लक्ष आणि हेळसांड करत असून मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार का ? असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे.

after derailment of suburban train down railway line resumed after three hours

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after derailment of suburban train down railway line resumed after three hours