दारूसाठी उधळण... पाच दिवसांचा स्टॉक दहा तासांत खल्लास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

सोमवारी लॉकडाऊन शिथिल झाल्यावर कर्नाटकात एकाच दिवसात तब्बल 45 कोटींची दारू विकली गेली. सरकारच्या तिजोरीत विक्रमी महसूल पडला...

बंगळूर ः गार्डन सिटी अर्थात उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाणारे बंगळूर शहर लॉकडाऊन उठवल्यानंतरच्या पहिल्या दिवशी मद्यप्रेमींच्याच राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाईल. अवघ्या दहा तासांत बंगळूरमध्ये 12.4 लाख लिटर मद्याची विक्री झाली. त्यानंतरही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तळीरामांनी दारूसाठी केलेल्या उधळणीमुळे एका दिवसात तब्बल 45 कोटींचा महसूल जमा झाला.

आरा रा रा! एका दिवसात झाली `इतक्या` लाक लिटर दारूची विक्री

कर्नाटकात नियमितपणे एका दिवशी दारूच्या विक्रीपोटी 65 कोटींचा महसूल जमा होतो, पण दहापैकी केवळ दोनच परवानाधारकांना सध्या मद्यविक्रीची मंजुरी देण्यात आली आहे. मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री होणारे पब्ज, क्लब आणि रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे एका दिवसातील 45 कोटींचा महसूल विक्रमीच मानला जात आहे. अनेक मद्यविक्रेत्यांनी पाच दिवसांचा साठा जमा केला होता, पण तो काही तासातच संपला. लॉकडाऊन आता उठवण्यात आले आहे. कर्नाटकात मद्यखरेदीस आत्ता मुभा आहे. त्यामुळे शक्य तेवढा साठा करण्यात आला आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन जास्तीची मागणी नोंदवली, पण मद्यपुरवठा करीत असलेल्या कर्नाटक राज्य बेव्हरेजेस काॅर्पोरेशनने मागणी पूर्ण करण्यास नकार दिला.  

हे वाचलंत का? : पीपीई किट्सच्या अभावामुळे ठाण्यातील डाॅक्टर कोरोनाबाधित?

बंगळूर पालिका क्षेत्रात नऊशेच्या आसपास मद्यविक्री करणारी दुकाने आहेत. ती सकाळी नऊ वाजता उघडतात, पण पहाटेपासूनच मद्य खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारपासून अनेकांना त्यांचा हवा तो ब्रॅण्ड मिळत नव्हता. अखेर आहे तोच चांगला, असे म्हणत अनेकांनी खरेदी केली. अनेकांनी बिअरऐवजी व्हिस्कीस पसंती दिली. 

मद्याच्या किमतीत १ एप्रिलपासून वाढ होणार होती, मात्र विक्रेत्यांना देण्यात आलेल्या उत्पादनांवर जुन्याच किमती होत्या. त्यामुळे आमचेच नुकसान होणार अशी तक्रार विक्रेत्यांनी केली. ग्राहकांनी मात्र नव्या भावानेच आमच्याकडून पैसे घेतल्याचे सांगितले.

महिलांसाठी वेगळी रांग
बंगळूरवासीयांसाठी सोमवार जणू मद्यखरेदीचाच दिवस होता. अनेक जण आपल्या पत्नी-मैत्रिणीसह आले होते. त्यामुळे दुकाने उघडण्यापूर्वी अनेक ठिकाणी असलेल्या रांगेत महिलांची संख्या लक्षणीय होती. काही दुकानांना महिलांसाठी वेगळी रांग करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार विक्रीही केली. 

ये बात...! ९० वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात... 

एकाचीच खरेदी 13.5 लिटर मद्य... 35 लीटर बिअर
कर्नाटक सरकारने एका व्यक्तीस 2.6 लिटर मद्य किंवा 18 लिटर बिअर देण्याची मुभा दिली आहे. त्यानंतरही एकानेच 13.5 लिटर मद्य आणि 35 लिटर बिअर खरेदी केल्याचे बिल समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्याची एकंदर किंमत झाली 52 हजार 841 रुपये. आता हे कोणी खरेदी केले ते अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र दुकानदाराने हे आठ जणांनी खरेदी केल्याचा दावा केला. मात्र त्यांनी एकत्रित पेमेंट केले, असे सांगितले. हे सर्व पेमेंट कार्ड पेमेंट असल्यामुळे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र ही चौकशी सुरू असतानच समाजमाध्यमांवर 95 हजार 347 ची खरेदी एकाने केली असल्याचे झळकले. पोलिसांनी लगेच त्याबाबत चौकशी सुरू केली. 

उत्साह मद्यविक्रीचा आणि खरेदीचाही

  • 96 वर्षीय दाकेम्मा कमरेत वाकलेली, पण तरीही मद्यखरेदी केल्यामुळे उत्साही. एवढेच नव्हे तर तिने मद्य आरोग्यास उपकारक असल्याचे सांगितले 
  • मद्यविक्रेत्यांकडून दुकानाची पूजा, प्रार्थना आणि नारळही वाढवण्यात आले
  • दुकानासमोर कापूर आणि उदबत्त्याही लावल्या. फटाकेही फोडण्यात आले
  • कर्नाटकात काही ठिकाणी पहाटे तीनपासून रांगा
  • काही विक्रेत्यांकडून दुकानास फुलांची सजावट
  • रांगेत बराच वेळ जाईल याची कल्पना असल्याने काहींनी पुस्तके, वर्तमानपत्रे, पाण्याची बाटली आणि छत्री सोबत घेतली होती
  • काहींनी रात्रीपासून रांगेत उभे राहण्याऐवजी चप्पल वा बॅगही ठेवली होते. सुरक्षित अंतर जपत असल्याचा दावा
  • कर्नाटकातील काही तालुक्यात रांग अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त लांब

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the lockdown was relaxed on Monday, liquor worth Rs 45 crore was sold in Karnataka in a single day. Record revenue to government