शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पिटाळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

कॉरिडॉरसाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आज पिटाळून लावले.

पेण (वार्ताहर) : कॉरिडॉरसाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आज पिटाळून लावले. शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असा आरोप आहे.

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी पेण तालुक्‍यातील रावे, कोपर, चुनाभट्टी, बळवली, आंबिवली, जिते, गोविरले, तरणखोप, चिंचघर, शितोळे, हमरापूर, अंतोरे, पाटणोली, उंबर्डे, मळेघर, कांदळे, कोळवे, वडखळ आणि अलिबाग तालुक्‍यातील कंडविरे, चरी, कोपर, सोगाव, कार्ले, खंडाळा, बागमळा, वाघोली, तळवडे आदी गावांतील जमीन संपादित करण्यात येणार आहेत. 

या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी गेल्या वर्षी जनसुनावणी झाली होती. त्या वेळी आक्षेप घेण्यात आले होते. आता जमीन सर्वेक्षणाची व सीमांकनाची प्राथमिक प्रक्रिया एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे; मात्र याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अधिकृत नोटीस बजावण्यात आलेल्या नाहीत. मोबदला काय देणार, प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत घेणार का, आदी कोणतीही माहिती शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे एमएमआरडीए आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला. 

रावे, कोपर, चुनाभट्टी, बळवली, आंबिवली, गोविरले, जिते येथील सुमारे ६०० शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला. या भूसंपादनाबाबत पूर्ण माहिती द्या, भूसंपादनाचा मोबदला काय देणार, प्रकल्पात उद्‌भवणाऱ्या समस्या, बाधित होणारी घरे, पुनर्वसनाची माहिती लेखी स्वरूपात मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची जनसुनावणी घेऊन प्रकल्पबाबतचे मत जाणून घ्यावे. लेखी स्वरूपात मिळत नाही, तोपर्यंत प्रकल्पबाबत कोणतेही काम किंवा सीमांकन करू नये, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद पाटील, बळवलीचे सरपंच संजय डंगर, शिवसेनेचे जगदीश ठाकूर, शिवसेना जिते विभागप्रमुख राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे सरचिटणीस नरेंद्र ठाकूर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

सात गावांची एकत्रित जनसुनावणी घ्यावी. शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करावे. त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा; अन्यथा कोणत्याही अधिकाऱ्याला पाय ठेऊ देणार नाही.
- संजय डंगर, सरपंच, बळवली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against to Virar-Alibaug Corridor in Pen