मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था एकत्रित येणार आहेत. मराठी शिक्षण कायदा, मराठी शाळेचे सक्षमीकरण, मराठी भाषा भवन, ग्रंथालयाचे सक्षमीकरण, मराठीचा अभिजात दर्जा, मराठी शाळांची मान्यता आदी मागण्यांसाठी सरकारवर दबाब टाकण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे.
यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, दक्षिण मराठी साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी अभ्यास केंद्र या संस्था आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठीच्या रक्षणासाठी "कोमसाप'चे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांनी पुढाकर घेतला आहे. त्यांनी सर्व साहित्य संस्थांना एकत्रित करून "मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ' स्थापन केले आहे. हे व्यासपीठ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध मागण्या आंदोलनातून मांडणार आहे.
|