
मुंबई : यंदाच्या हंगामात कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे ‘नाफेड’मार्फत आणखी २ लाख टन कांद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्वारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांना केली आहे.
केंद्र सरकारने निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत २ टक्क्यांऐवजी १० टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा, अशी राज्य सरकारची विनंती यापूर्वीच नाकारली आहे. त्यामुळे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने या योजनेत १० टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे सध्या ‘नाफेड’कडून होत असलेली कांदा खरेदी आणखी २ लाख टनांनी वाढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्राद्वारे केली आहे.