शहापुरातील वेहलोंडे गावात साकारणार कृषी पर्यटन, रोजगारासाठीचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न

Agri-tourism
Agri-tourism

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍याच्या दुर्गम आदिवासी व अभयारण्य भागात वसलेल्या वेहलोंडे गावातील नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी गावातच कृषी व वन विभागाच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचा मानस वेहलोंडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेश विशे यांनी व्यक्त केला आहे. या कृषी पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांचे रोजगारासाठीचे स्थलांतर रोखण्यास मदत होणार असून शेतांमध्ये विविध पिकांची लागवड केल्याने त्यांना त्यातून उत्पन्नदेखील मिळणार आहे..

तानसा अभयारण्याजवळ वसलेले एक हजार लोकसंख्या असलेले वेहलोंडे हे गाव ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या वेशीवर आहे. गावात पूर्वी जाण्यासाठी रस्त्याची सुविधादेखील नव्हती. तसेच येथील आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होत असलेले स्थलांतर, त्यातून त्यांना मिळणारा रोजगारदेखील त्यांच्या परिश्रमाच्या तुलनेत कमी होता. या बाबीची गांभीर्याने दाखल घेत याच गावात राहणारे व अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या उपसरपंच जितेश विशे यांनी गावात विविध सुविधा उभारण्याबरोबरच गावात कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

गावातील नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर हा महत्त्वाचा विषय त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे आपल्या एक हेक्‍टर जमिनीवर जिल्हा परिषदेच्या माध्यामतून तलावाची निर्मिती करून उरलेल्या जागेत भाजीपाला, सोनचाफा, मोगरा तसेच मत्स्यशेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. यातून कशा प्रकारे उत्पन्न मिळू शकते, याची माहिती विशे यांनी गावकऱ्यांना दिली. तसेच शेतीचे महत्त्वदेखील पटवून दिले. त्यातून प्रेरणा घेत गावकऱ्यांनीही शेतीला प्राधान्य देत भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. गावात शेतकऱ्यांकडून पिकविण्यात येणाऱ्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच येथील निसर्गरम्य वातावरणाचा शहरी भागातील नागरिकांना आस्वाद घेता यावा व त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे उपसरपंच विशे यांनी सांगितले. 

कृषी पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखणार आहे. शेतांमध्ये विविध पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नदेखील मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून येत्या वर्षभरात हे केंद्र सुरू होण्याची अपेक्षा आहे. 
- जितेश विशे, उपसरपंच वेहलोंडे 

(संपादन : वैभव गाटे)

Agrotourism to be set up at Vehlonde village in Shahapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com