ऐरोली नॉलेज पार्क रस्ता अंधारात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

ऐरोली नॉलेज पार्क रस्तावरील पथदिवे मागील आठवडाभरापासून बंद अवस्थेत असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटसवर प्रवास करावा लागत आहे. त्यातच या मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांतून वाट काढताना अपघाताची शक्‍यता असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईहून ऐरोली पुलामार्गे थेट ऐरोली नॉलेज पार्क रस्ता हा ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, भिवंडीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे; मात्र या रस्त्याच्या दुतर्फा असणारे पथदिवे मागील आठवडाभरापासून बंद अवस्थेत असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटसवर प्रवास करावा लागत आहे. त्यातच या मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांतून वाट काढताना अपघाताची शक्‍यता असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील ठाणे बेलापूर मार्गाच्या प्रवेशद्वारापासून ऐरोली सेक्‍टर २० येथील नेव्हा गार्डन या इमारतीपर्यंत तीन किलोमीटरच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील वर्षी मुंब्रा बायपास रस्त्याच्या कामामुळे या रस्त्यावरून गेलेल्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. यासंदर्भात पालिकेचे कार्यकारी अंभियता प्रवीण गाडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

खड्ड्यांमुळे ऐरोली नॉलेज पार्क रस्त्याची आधीच दयनीय अवस्था झाली असताना, आता येथील पथदिवेही बंद अवस्थेत असल्यामुळे वाहनांच्या हेडलाईटसवर खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ येथील पथदिवे सुरू करावे.
-संजय नेहरकर, वाहनचालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Airoli Knowledge Park Road without light