Fraud News : बेरोजगार तरुणांची रायगड सुरक्षा मंडळाच्या अधिकार्‍यांकडून फसवणूक

रायगड जिल्ह्यातील विविध कंपन्या, कार्यालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून अलिबाग, पेण तालुक्यातील हजारो तरुणांकडून फसवणूक झाल्याची बाब आली समोर.
raja keni
raja kenisakal

अलिबाग - जिल्ह्यातील विविध कंपन्या, कार्यालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून अलिबाग, पेण तालुक्यातील हजारो तरुणांकडून फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. या तरुणांची रायगड सुरक्षा मंडळाकडून मुलाखती आणि पैसे देऊन चार वर्षे उलटले, तरी नोकरी मिळत नाही. यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली हे तरुण आता एकवटले आहेत.

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ हे निम शासकीय मंडळ आहे. या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. जिल्ह्यातील विविध कंपन्या, कार्यालयात सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळेल, असे प्रलोभन दाखवत प्रत्येकाकडून ४० हजार रुपयांपर्यंत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पैसे उकळले.

या घटनेला चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटला, तरीही रायगड सुरक्षा मंडळाने जिल्ह्यातील १ हजार २०० तरुणांना नोकऱ्या दिल्याच नाही. कंपन्यांकडून सुरक्षा रक्षकाची वाढीव मागणी नसतानाही मंडळाने मुलाखती घेतल्या. पात्र उमेदवारांना नोकरीची खात्री देत पैसे घेतले. मात्र, अद्याप नोकरी मिळालीच नाही.

ज्यांची फसवणूक झाली असे बहुतांश तरुण भीती आणि लाजेखातर पुढे येऊन तक्रार करण्यास धजावत नाहीत. अशा तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावे, असे आवाहन राजा केणी यांनी केले आहे. या सर्व तरुणांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, अशी ग्वाही देत सर्वांनी असेच एकजुटीने राहावे, असे आवाहन केणी यांनी केले.

माझ्याकडून ४० हजार रुपये रोखीने घेण्यात आले. एका व्यक्तीकडे हे पैसे दिले होते. त्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे विचारणा केली; परंतु नोकरी नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत, असे बेरोजगार तरुण प्रकाश मेंगाळ म्हणाले.

तरुणांना हमखास न्याय मिळेल !

बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदारांचाही पाठिंबा आहे. काही दिवसांतच रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन देण्यात येणार आहेत.

सरकार आपले असल्याने बेरोजगार तरुणांना हमखास न्याय मिळेल, अशी ग्वाही राजा केणी यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा; अन्यथा रस्त्यावर उत्तरून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नोकरीचे प्रलोभन दाखवून कुणी पैसे घेतले असतील, तर त्याचे सबळ पुरावे घेउन संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रार करावी. माझ्या तरी असे निदर्शनास आले नाही की, कोणी पैसे घेतले आहेत.

- विजय चौधरी, अध्यक्ष , रायगड सुरक्षा मंडळ

लेखी, ग्राऊंड परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर हमखास नोकरी लागेल, असे सांगून माझ्याकडे ८० हजार रुपये मागण्यात आले होते. त्यातील ४० हजार रुपये मी उसनवारी करून पोच केले; माझ्याप्रमाणेच अलिबाग, पेण तालुक्यातील अनेक तरुण आहेत. त्यांनाही अद्याप पोस्टिंग दिलेली नाही. त्यामुळे पगारही सुरू झालेला नाही.

- गजेंद्र म्हात्रे, बेरोजगार तरुण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com