ठाण्याची बाजारपेठ अखेर रविवारपासून गजबजणार; पालकमंत्र्यांच्या निर्णयाने दुकानदार खूश 

राजेश मोरे
Thursday, 13 August 2020

लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या शहरातील हजारो दुकानदारांना दिलासा मिळला आहे.एप्रिलपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या व्यापाऱ्यांनी शहरातील सर्व दुकाने एकाच वेळी सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून 15 ऑगस्टनंतर सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार रविवार, 16 ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत. 

ठाणे : लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या शहरातील हजारो दुकानदारांना दिलासा मिळला आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाने लॉकडाऊन पुकारला. मात्र, एप्रिलपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या व्यापाऱ्यांनी शहरातील सर्व दुकाने एकाच वेळी सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून 15 ऑगस्टनंतर सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार रविवार, 16 ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत. 

क्लिक करा : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार; 13 दिवसांता तीन महिन्यांचा पाणीसाठा

ठाणे शहरात रुग्ण वाढत असल्याने अतिरिक्त रहदारी टाळून दुकाने उघडण्यासाठी "पी वन' आणि "पी टू' ही पद्धत सुरू ठेवण्यात आली होती. त्यानुसार एक दिवस डावीकडील आणि एक दिवस उजवीकडील दुकाने सुरू होती. मात्र लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिकदृष्ट्या डबाघाईला आलेल्या दुकानदारांना त्याचा अधिक फटका बसत होता. त्यामुळे सातत्याने सर्व दुकाने एकाच वेळी उघडण्याची मागणी होत होती. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील 25 व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 

बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. तसेच कोरोनाविरोधात लढताना आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आश्वासन या व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिले. त्याची दखल घेऊन अखेर पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना 16 ऑगस्टपासून सर्व दुकाने उघडण्यासाठी "पी वन', "पी टू'चा नियम बंधनकारक करू नये, असे आदेश दिले आहेत. 15 ऑगस्टनंतर शहरातील सर्व दुकाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल, मार्केटस्‌, जिम व स्वीमिंग पुलाबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. 

बैठकीत महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त- 1 गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त- 2 संजय हेरवाड, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर, उद्योजक संघटनेचे भावेश मारू आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुरू करण्यात आलेल्या "डिजी ठाणे'च्या "बुकिंग टाईमस्लॉट' प्रणालीचे उद्‌घाटन करण्यात आले. 

सावधान! सावधान! सावधान! येत्या रविवारी आणि सोमवारी पावसाचा धडाका; कुठे बरसणार कोसळधारा, वाचा सविस्तार  

पालिका प्रशासनाचे कौतुक 
ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुपटीचा वेगही 90 दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे 3.5 टक्‍क्‍यांवरून 3.2 टक्‍क्‍यांवर आले आहे. पालिका सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्‍य झाले आहे, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. 
----------------
(संपादन : प्रणीत पवार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All shops in Thane will be open from Sunday, a relief to traders