#HopeOfLife : पतीपाठोपाठ पत्नीचीही कर्करोगाशी लढाई

cancer
cancer

मुंबई : ‘पतीला किडनीचा कर्करोग झाल्याचे दहा वर्षांपूर्वी समजले. पाटण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्या वेळी त्यांची किडनी काढण्यात आली. या आजारातून त्यांची सुटका होईल असे वाटत असताना सात-आठ वर्षांनी दुसऱ्या किडनीलाही कर्करोगाची लागण झाली. त्यांना २०१७ मध्ये मुंबईतील टाटा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गेल्या महिन्यात मलाही रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि आमच्या पायाखालची वाळूच सरकली...’ ही करुण कहाणी आहे टाटा रुग्णालयाबाहेर राहणाऱ्या रिमादेवी यांची.

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी अनिल कुमार गुप्ता मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. पत्नी रिमादेवी आणि तीन मुले अशा परिवाराची जबाबदारी असलेल्या गुप्ता यांना २००९ मध्ये किडनीचा कर्करोग झाल्याचे समजले. जीव वाचवायचा असल्यास किडनी काढावी लागेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांत अनिल कुमार कर्करोगातून बरे झाले. संसाराचा गाडा पूर्वपदावर येऊ लागला. परंतु, सात-आठ वर्षांनी पुन्हा तोच त्रास सुरू झाला. त्यानंतर मुंबईतील टाटा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्यांच्या दुसऱ्या किडनीलाही कर्करोगाची बाधा झाल्याचे सांगितले. तो आमच्यासाठी दुसरा मोठा धक्का होता, असे रिमादेवी सांगतात. पतीवर उपचार करण्यासाठी आम्ही घरही विकले. दोन वर्षांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केमोथेरपी, रेडिएशनसाठी कधी एक किंवा दोन महिन्यातून एकदा, तर कधी १५ दिवसांतून एकदा तारीख मिळते. पंधरा दिवसांसाठी गावी जाणे परवडत नाही आणि मुंबईत खोली घेऊन राहणेही परवडत नाही. त्यामुळे टाटा रुग्णालयाबाहेर संसार थाटावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, रिमादेवी यांनाही पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. केईएम रुग्णालयात बायोप्सी केली असता, त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे या परिवाराल पुन्हा मोठा धक्का बसला. गेल्या महिनाभरापासून रिमादेवी यांच्यावरही कर्करोगाचे उपचार सुरू आहेत.

लेकरांची आबाळ
उपचारासाठी गुप्ता कुटुंबाने घरदार विकल्याने त्यांच्या तीन लहान मुलांची आबाळ होत आहे. पतीच्या भावांनी मदत करण्यास असमर्थता दाखवल्याने रिमा यांनी आपल्या मुलांना माहेरी आई-वडिलांकडे पाठवले. पती आणि स्वत:ला झालेल्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या रिमादेवी यांना मुलांची आठवण आली, की गहिवरून येते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com