#HopeOfLife : अशिक्षितांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

भारतात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूत अशिक्षित नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

भारतात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूत अशिक्षित नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. कर्करोगाने मृत्यू होणाऱ्या १ हजार जणांमागे ७९ पुरुष अशिक्षित असतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण १४० इतके प्रचंड असल्याचे लॅन्सेट या संस्थेने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

#HopeOfLife : होय प्रदूषणामुळे होतो कर्करोग

कर्करोग प्राथमिक टप्प्यावर समजल्यास त्यावर उपचार करणे सोपे असते. यात रुग्ण ठणठणीत बरा होण्याची शक्‍यताही अधिक असते. मात्र, भारतात दुखणे अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक वेळा कर्करोग हा तिसऱ्या टप्प्यावर आल्यानंतर लक्षात येतो. अनेक वेळा मोलमजुरी करणारे डॉक्‍टरांकडे जाण्याचे टाळतात. महिलांमध्ये हे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशिक्षित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कर्करोगामध्ये अधिक असते. आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये अधिक आहे. आजार असह्य झाल्यानंतरच त्या डॉक्‍टरकडे जातात. त्यामुळे महिलांना कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे, असे तज्ज्ञ डॉक्‍टरांनी माहिती देताना सांगितले. व्यसन आणि संसर्गामुळे होणाऱ्या कर्करोगातही अशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे, असे लॅन्सेट या संस्थेने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

#HopeOfLife : अंडकोषाच्या कर्करोगाबाबत जागृक राहा

व्यसनामुळे एक लाख पुरुषांना कर्करोग होत असेल तर त्यात अशिक्षितांचे प्रमाण हे ३९.३ टक्‍के इतके प्रचंड आहे. प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण ३७.५ टक्‍के आणि त्यापुढील शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण १८.२ टक्‍के इतके असते; तर संसर्गामुळे एक लाख महिलांमधून ४१.२ महिलांना कर्करोग होतो, तर प्राथमिक शिक्षण घेतलेल्या महिलांना २१.७ टक्‍के आणि त्यापुढील शिक्षण घेतलेल्या १०.३ टक्‍के महिलांना कर्करोग होण्याचा धोका असतो.

तंबाखूमुळे घसा, मुख, अन्ननलिका तसेच फुप्फुसाचा कर्करोग होते. पुरुषांमध्ये मौखिक आणि फुप्फुसाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे; तर संर्सगामुळे यकृत, रक्ताचा तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. मौखिक कर्करोगासाठीही संसर्ग कारण ठरू शकते.

web title : Cancer rate is high among illiterates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer rate is high among illiterates