Ambani Explosives Case: तपासाच्या नावाखाली सचिन वाझेंनी जप्त केलेले पुरावे नष्ट?

Ambani Explosives Case: तपासाच्या नावाखाली सचिन वाझेंनी जप्त केलेले पुरावे नष्ट?

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरा शेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले होते. त्या वस्तू गुन्हे शाखेच्या रेकॉर्डवर नसल्याचे खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असून आता नवीन माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराशेजारी मिळाली ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. या स्कॉर्पिओ गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सद्गुरु कार डेकोरेटरच्या दुकानातुन बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ठाण्यातील दुकान मालक नवीन तलरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन माझ्याकडून नंबर प्लेट बनवण्याची ऑर्डर द्यायचे आणि त्या पद्धतीने त्यांना नंबर प्लेट बनवून दिल्या. मनसुख हिरेन हे देखील कार डेकोरेशनच्या व्यवसायात होते. त्यामुळे त्यांना या नंबरप्लेट्स लागत असतील, असे मला वाटले.

माझ्या दुकानात दोनवेळा पोलिस आले, एकदा सचिन वाझे स्वतः आले सोबत चार पोलिस होते, नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा टीम आली, 5 जण होते पण सचिन वाझे नव्हते. त्या टीमने माझी डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज अशा सर्व गोष्टी नेल्या. आता माझ्याकडे कोणताही डेटा नाही, असे नवीन तलरेजा यांनी सांगितले आहे. पण या कोणत्याही वस्तू रेकॉर्डवर घेण्यात आलेल्या नाही. तसेच पंचाच्या नोंदी वगैरे उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

वाझे यांची चौकशी सुरु असताना सोमवारी अचानाक त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर वाझे यांच्या कबुलीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून, मोठ्या प्रमाणात हालचालींना सुरुवात झाली आहे. वाझे यांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते होते. यामुळे या नेत्यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  वाझेच्या अटकेनंतर एनआयएच्या हाती भक्कम पुरावे लागल्याची चर्चा असतानाच सोमवारी वाझेंचे पुन्हा एकदा पोलिस सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. यांचा पूर्वी 16 वर्षांपूर्वी ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. सचिन वाझे यांना 16 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 6 जून 2020 रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार सचिन वाझे, राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम या चारही अधिका-यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्यात आले होते. मात्र, अँटिलिया स्फोटके प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील घाटकोपर येथील बॉम्ब स्फोट प्रकरणात 25 डिसेंबर 2002 रोजी ख्वाजा युनूस याला अटक झाली होती. त्यानंतर तो फरार झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र ख्वाजाच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांवरच आरोप केले. पोलिस कोठडीत त्याचा छळ झाल्याने मृत्यू झाल्याचा आणि नंतर पोलिसांनी हा बनाव रचल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्यांच्या केंद्रस्थानीही सचिन वाझे आणि इतर पोलिस अधिकारी होते. त्यामुळे पुढे वाझे यांच्यासह चार अधिका-यांना न्यायालयाच्या आदेशानुसार 3 मार्च 2004 मध्ये  निलंबित करण्यात आले होते. 

त्यानंतर आता स्फोटकं प्रकरणानंतर एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांचे पुन्हा सोमवारी निलंबन करण्यात आले. याशिवाय सोमवारी दुसऱ्या दिवशी देखील सीआययू मधील दोन अधिकाऱ्यांची एनआयएने चौकशी केली. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी ‘एनआयए’ने नुकतीच ताब्यात घेतली होती. मात्र, या गाडीविषयी एनआयच्या अधिकाऱ्यांना अद्याप संभ्रम आहे. ही गाडी गुन्ह्यात वापरताना गाडीची ओळख पटू नये म्हणून गाडीत अनेक बदल करून काळजी घेतली होती, असं नव्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. त्याबाबतची माहिती या अधिका-यांकडून घेण्यासाठी चौकशीला बोलवले होते. साडे सात सात चौकशीनंतर एक अधिकारी बाहेर पडला.
 
घटनेच्या दिवशी एटीएस अधिका-यासोबत वाझेंचा वाद

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार 25 फेब्रुवारीला अंबानी यांच्या घराजवळ सापडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणं स्फोटकांचे असल्यामुळे एटीएसचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.  गुन्हे शाखेचे पथक ज्या पथकात सचिन वाझेही होते. ते त्यापूर्वीच घटनास्थळी उपस्थित होते. त्यावेळी एटीएसच्या वरिष्ठ अधिका-यांनी गाडीबद्दल विचारले असता वाझे यांनी सँडविच खाता खाताच पोलिस हवालदाराला साहेबांना गाडी दाखल, असे सांगितले आणि दुर्लक्ष केले. पोलिस खात्यातील कोणताही प्रोटोकॉल न पाळता वाझे यांच्या या वागण्यावरून या अधिका-याचा वाझेंसोबत वादही झाला. वाझेंच्या या वागण्याची तोंडी तक्रार या अधिका-याने वरिष्ठांनाही केली होती.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ambani Explosive Case Evidence destroyed confiscated items notonrecords crime branch

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com