आंबेसरी बारीपाडा पूल कोसळला

आंबेसरी बारीपाडा पूल कोसळला

डहाणू: डहाणू तलासरी राज्यमार्गावरील आंबेसरी बारीपाडा येथील रस्त्यावर असलेला पूल आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धुंदलवाडी, तलासरी, उधवा भागातील शेकडो गावपाड्यांचा संपर्क तुटल्याने त्याचा फटका हजारो लोकांना बसला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

आंबेसरी बारीपाडा येथील या पुलाचे बांधकाम दगड, वीट, सिमेंटच्या साहाय्याने करण्यात आल्याचे दिसून येते. मागील वर्षी या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती करताना या पुलाची दुरुस्ती केली नव्हती का? असा प्रश्‍न विचारला जात आहे. हा पूल धोकादायक अवस्थेत असल्याने, संबंधित विभागाने त्याकडे लक्ष देणे आवश्‍यक होते. हा पूल नाल्यापासून फक्त पाच ते सात फूट उंच होता. दरी खिंडीत असल्याने खालून एक छोटासा नाला वाहतो. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेला पूल पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पूल पडला तेव्हा कोणत्याही प्रकारचे वाहन त्यावरून गेले नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्याने धावतात. त्यामुळे हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कारवाई सुरू असून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

डहाणू तालुक्‍यातील दाभोण, डेहणे पळे, मोडगाव,आशागड, गंगाणगाव, चारोटी, सरावली, रानशेत इत्यादी ठिकाणी असलेले रस्त्यावरील पूल हे धोकादायक अवस्थेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्‍यातील किती पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले आहे, याबाबत सांशकता आहे. डहाणुतील पूल कोसळण्याची ही दुर्घटना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व संबंधित खात्याच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. 

"हा पूल अतिशय जुना झाला होता; तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या नूतनीकरण व बांधकामाकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणादेखील दिसून येतो. दुर्घटनेत प्रवाशांना जीव गमवावा लागला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती का? 
- वसंत भसरा, सामाजिक कार्यकर्ते 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com