आंबेडकर स्मारक तीन वर्षांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - दादरमधील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नियुक्त केलेल्या कंपनीने तिथे माती चाचणीचे काम सुरू केले आहे. भव्य असे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार एमएमआरडीएने केला आहे.

मुंबई - दादरमधील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नियुक्त केलेल्या कंपनीने तिथे माती चाचणीचे काम सुरू केले आहे. भव्य असे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार एमएमआरडीएने केला आहे.

इंदू मिलच्या १२.५ एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्मारकाचा विकास करण्यासाठी सरकारने एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर स्मारकाच्या बांधकामासाठी मे. शापूरजी पालनजी कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीस एमएमआरडीएने ९ फेब्रुवारी २०१८ ला बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे.

निधीअभावी काम रखडण्याची चिन्हे
स्मारकाच्या कामासाठी ५९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे; मात्र एमएमआरडीएने अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद केली आहे. ती अपुरी असून, बुधवारी स्मारकाचे काम सुरू झाले आहे; पण निधीअभावी ते मध्येच रखडण्याची चिंता आहे. सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून मुख्यमंत्री आणि राज्याचे सचिव यांना पत्र दिले आहे, असे स्मारकाची प्रथम मागणी करणारे आंबेडकरी अनुयायी चंद्रकांत भंडारे यांनी सांगितले.

स्मारकातील सुविधा
सरकारने मंजूर केलेल्या सुधारित आराखड्यामध्ये प्रशासकीय कार्यालय, उपाहारगृह, स्वच्छतागृह, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतीक्षालय, सभागृह, ध्यानधारणा केंद्र, वाहनतळ, वस्तुसंग्रहालय अादी सोयीसुविधा असणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्याखालील वर्तुळाकृती पादपीठामध्ये अभ्यागत कक्ष, ग्रंथालय, कलादालन आणि सायक्‍लोरामा थिएटर यांचा समावेश असेल. चवदार तळेसारख्या  महत्त्वाच्या घटनेचा प्रकाश व ध्वनी कार्यक्रमाद्वारे नागरिकांना अनुभव घेता येणार आहे.

बांधकामापूर्वी आवश्‍यक असलेले माती चाचणीचे काम सध्या सुरू आहे. ते येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. प्राथमिक कामे पूर्ण होताच स्मारकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. भव्य असे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
- दिलीप कवटकर, जनसंपर्क अधिकारी, एमएमआरडीए

Web Title: Ambedkar memorial in three years