esakal | सलाम! पेन्शनच्या पैशातून हॉस्पिटलला दान केला व्हेंटिलेटर

बोलून बातमी शोधा

सलाम! पेन्शनच्या पैशातून हॉस्पिटलला दान केला व्हेंटिलेटर

मोहन कुलकर्णी यांनी पेन्शनची कमाई अपुरी पडल्याने कर्जही काढलं...

सलाम! पेन्शनच्या पैशातून हॉस्पिटलला दान केला व्हेंटिलेटर
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात वाढत्या कोरोनामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ भयावह असून या रूग्णांना प्रसंगी बेड्स, व्हेंटिलेटर्स यासारख्या सुविधा उपलब्ध होणंही कठीण झालंय. अशातच अंबरनाथच्या एका ६५ वर्षांच्या व्यक्तिने कौतुकास्पद कृत्य केल्याची माहिती आहे. अंबरनाथचे ६५ वर्षीय मोहन कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत काम करत होते. ते त्यांची सेवा संपवून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळून लागले. हे संपूर्ण पेन्शन म्हणजे अंदाजे ४ लाख रूपये हे त्यांनी हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरसाठी खर्ची घातले. अंबरनाथच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांनी नुकताच एक व्हेंटिलेटर दान केला. त्यांच्याजवळ असलेले पेन्शनचे ४ लाख रूपये त्यांनी व्हेंटिलेटर खरेदीसाठी वापरलेच. पण व्हेंटिलेटरची किंमत साडेसहा लाख होती. त्यामुळे त्यांनी अडीच लाखांचे अतिरिक्त लोन घेत हा व्हेंटिलेटर विकत घेतला आणि अंबरनाथच्या रूग्णालयाला दान केला.

हेही वाचा: वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

कोरोना रुग्णांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी अंबरनाथमच्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासू लागला. अंबरनाथमध्ये काही दिवस दररोजची कोविड रूग्णसंख्या ४००च्या वर जात होती. अंबरनाथच्या शासकीय हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत रसाळ यांनी उद्योगपती आणि नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. हॉस्पिटलमधील सुविधा तोकड्या पडत असताना लोकांनी आणि उद्योगपतींनी हॉस्पिटला वैद्यकीय उपकरणांची मदत करावी, असं सांगण्यात आलं होतं. या आवाहनाला ६५ वर्षीय मोहन कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे! रुग्णांसाठी स्वत:ची कार केली रुग्णवाहिका

सर्वप्रथम मी हॉस्पिटलला रूग्णवाहिका दान करण्याचा विचार करत होतो. पण मला समजलं की हॉस्पिटल्सकडे आवश्यक तितक्या रूग्णवाहिका आहेत, त्यांना व्हेंटिलेटर्सची गरज आहे. त्यावेळी मी अडीत लाखांचे अतिरिक्त लोन घेतलं आणि व्हेंटिलेटर विकत घेतला. मला अशी आशा आहे की माझ्या मदतीमुळे काही लोकांचे प्राण वाचतील", असं टीओआयशी बोलताना मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.

८५० शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला एका दिवसाचा पगार दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जमा होणाऱ्या निधीतून 5 Bi-PAP मशिन्स घेतली जाणार आहेत. कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथला राहत होते. काही दिवसांपूर्वी ते कांजूरमार्गला शिफ्ट झाले. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीला कर्करोगाशी झुंज देताना प्राण गमवावे लागले. त्यामुळे मोहन कुलकर्णी यांना शासकीय रूग्णालयासाठी काहीतरी मदत करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी या आलेल्या संधीचा सकारात्मक विचार केला.