लॉकडाऊनमुळे विशेष मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला, विशेष मुलांच्या चिडचिडेपणात वाढ

लॉकडाऊनमुळे विशेष मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला, विशेष मुलांच्या चिडचिडेपणात वाढ

नवी मुंबई : कोरोनामुळे महापालिकेचे अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचा मुलांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शाळेने लावलेली शिस्त या सहा महिन्यांत बिघडल्यामुळे मुलांच्या वर्तणुकीत बदल होऊन त्यांच्यात चिडचिड वाढली आहे. बहुतांश मुलांमधील शिघ्रकोपीपणा कधी कधी हाताबाहेर जात असल्याने पालकांचा ताप वाढला आहे. 

मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर साधारणपणे 23 मार्चपासून सर्व शाळांसोबत ईटीसी प्रशिक्षण केंद्रही बंद करण्यात आले. त्यामुळे वाशीमध्ये महापालिकेतर्फे स्वतंत्र इमारतीमधील ईटीसी सेंटर गेले सहा महिने बंद अवस्थेत आहे. सध्या या इमारतीमध्ये पालिकेने कोव्हिड केअर केंद्र सुरू केले आहे. 

ज्यावेळी शाळा सुरू होत्या. तेव्हा मुलांना सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळांमध्ये शाळेत जावे लागत होते. सकाळच्या शाळेत जाण्याच्या तयारीपासून मुले व्यस्त असायची. शाळेत गेल्यावर मूल्यांकन आणि बौद्धिकता वाढवण्यासाठी घेतले जाणारे अभ्यास वर्ग, चित्रकला, रंगकाम, विविध खेळ आदी उपक्रमांमध्ये मुले रमायची. तसेच, या उपक्रमांतून मुलांचा मानसिक विकासही व्हायचा. त्यामुळे मुलांमधील पोरकटपणा कमी होऊन चांगली समज निर्माण झाली होती. 

शाळेतील या उपक्रमांव्यतिरिक्त शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना फिजियोथेरेपी, व्यायाम आदी प्रकार घेतले जात होते. शाळेच्या वेळा ठरल्या असल्याने त्यांच्या दिवसाचे नियोजन ठरलेले असायचे; मात्र सहा महिन्यांत शाळाच बंद असल्याने या मुलांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व काही बदलल्यामुळे पालकांना नाकीनऊ झाले आहेत. 

हे झालेत बदल 
मतिमंद - गतिमंद, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर, स्वमग्न आणि बहुविकलांग अशा पाच प्रकारातील मुलांचा समावेश विशेष मुलांमध्ये होतो. गेले सहा महिने त्यांना घरातच राहावे लागत असल्याने त्यांचा मानसिक विकास खुंटला असून बौद्धिक विकासही होत नाही. जर भावंडे असतील, तर दोघांमध्ये क्षुल्लक गोष्टींवरील भांडणे अतिटोकाला जातात. संयमता कमी होऊन त्यांच्यात चिडचिडेपणा आला आहे. शिघ्रकोपी होत असल्याने कधीही हाणामारी करतात. 

ऑनलाईन शिक्षणाचाही बोजवारा  
मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या शाळांसोबत ईटीसी (अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र) बंद करण्यात आले. त्यानंतर 25 मार्चपासून स्मार्टफोनवर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परंतु, या शिक्षणाची माहिती  बहुतांश पालकांना नसल्यामुळे दोन महिन्यांनी या शिक्षणाचा लाभ मिळाला. मोबाईलच्या स्क्रीनसमोर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुले बसत नाहीत. यादरम्यान जर नेटवर्कमुळे ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय आलाच, तर एकाग्रता भंग पावल्यामुळे पुन्हा बसण्यास मुले नकार देतात.  

शाळा बंद झाल्यापासून मुलांच्या वर्तणुकीत बदल होऊ लागले आहेत. मूल्यांकन वाढवण्यासाठी अभ्यास व खेळ, शरीरातील व्यंग दूर करण्यासाठी फिजियोथेरेपी, व्यायाम दिला जात होता. मात्र, आता तोदेखील बंद झाला आहे.
- निर्मला थोरात, पालक  

ईटीसी सेंटर संचालिका वर्षा भगत म्हणतात, ऑनलाईन प्रशिक्षण फायदेशीर ठरत आहेत. मुले स्क्रीनसमोर दोन तास असतात. काही गोष्टी आम्ही पालकांकडून करून घेतो; परंतु ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय आहे. त्यामुळे ईटीसी सेंटरच्या इमारती पुन्हा आम्हाला विद्यार्थ्यांसाठी परत कराव्यात, अशी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. 

नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबत मत मांडलं आहे. ईटीसी प्रशिक्षण केंद्रातील मुलांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सध्या कोरोनामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला असेल; परंतु ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असतील, तर त्या दूर केल्या जातील असं ते म्हणालेत. 

amid corona lockdown mental development of special kids is on hold

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com