कचरा वर्गीकरणाची व्याख्या बददली, आता 'या' पद्धतीने करायचं कचऱ्याचं वर्गीकरण, नाहीतर...

शर्मिला वाळुंज
Tuesday, 19 May 2020

कचरा वर्गीकरणाची व्याख्या पालिकेने बदलली असून ओला सुका कचऱ्याबरोबरच घरगुती घातक कचरा अशा पद्धतीने कचऱ्याचे आता वर्गीकरण करावयाचे आहे

ठाणे - शहरातील स्वच्छता आणि कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहरात शून्य कचरा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत कचरा वर्गीकरणाची व्याख्या पालिकेने बदलली असून ओला सुका कचऱ्याबरोबरच घरगुती घातक कचरा अशा पद्धतीने कचऱ्याचे आता वर्गीकरण करावयाचे आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास तसेच प्लास्टिक पिशवीत कचरा देणाऱ्यांविरोधात येत्या 20 मे पासून कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. परंतू येत्या 20 मे पासून याची खरेच अंमलबजावणी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. एप्रिल महिन्यातही पालिका प्रशासनाने नोटीस काढून 30 एप्रिलपासून कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतू प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. आता प्रशासनाने नव्याने आदेश दिले असून कारवाईच्या केवळ तारखा दिल्या जातात की प्रत्यक्षात कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट
 

कोरोना संकटकाळात साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहर स्वच्छतेला प्राधान्य देत येत्या 20 मे पासून शून्य कचरा मोहीम शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेनुसार ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा या प्रमुख प्रकारामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहे. बुधवारपासून महानगरपालिका एकत्रित मिश्र कचरा उचलणार नाही. तसेच वर्गीकरण करुन न देणाऱ्या, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात 20 मे नंतर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतील व दंडही आकारण्यात येईल असा इशारा घनकचरा विभागाने दिला आहे.

शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाने आदेश जारी केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होते याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील बहुसंख्य सोसायट्या, खासगी आस्थापने, कार्यालय, हॉटेल्स, कारखाने यांना अद्याप नोटीस मिळालेल्या नसल्याचे समजते. त्यात एप्रिल महिन्यातही पालिका प्रशासनाने अशाच स्वरुपाची कचऱ्याचे 9 प्रकारात वर्गीकरण करण्यात यावे अन्यथा 30 एप्रिलपासून कचरा उचलला जाणार नाही, गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. नियोजनाच्या अभावामुळे ही मोहीम बारगळली आता 20 मेपासून ही मोहीम राबविण्यात येणार असली तरी नियोजनाचा अभाव दिसून येतो. या मोहिमेची जनजागृती योग्य स्वरुपात झालेली नसून नागरिकांना अद्यापही याविषयी काही माहिती नाही. काही सामाजिक संस्था शासनाच्या या निर्णयाची जनजागृती करण्याचे काम करीत असल्या तरी लॉकडाऊनमुळे संस्थांवरही जनजागृतीविषयी अनेक बंधने येत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देत जनजागृती करण्यावर भर दिला पाहीजे अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

सोसायट्यांमधून जनजागृतीसाठी परवानगी मिळत नाही, त्यांना नोटीस मिळाली आहे का याविषयी विचारणा केल्यास त्यांचे उत्तरही येत नाही. अनेक अडचणी येत आहेत, परंतू तरीही पालिकेचा स्तूत्य उपक्रम असल्यााने त्याविषयी आम्ही जनजागृती करत असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. 

महापालिकेने जारी केलेल्या तारखांमध्येही घोळ 

महापालिकेने मे महिन्यात जारी केलेल्या नोटीसमध्येही तारखांचा घोळ आहे. महापालिकेने प्रसारित केलेल्या एका नोटीसमध्ये 20 मे पासून कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. तर समाजमाध्यमावर पालिका प्रशासनाच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या संदेशामध्ये 25 मे पासून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे नक्की कधीपासून कारवाई होणार याविषयीही गोंधळाचे वातावरण आहे.

amid corona now we have to thro household garbage in three parts read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amid corona now we have to thro household garbage in three parts read full news