राष्ट्रपतिपदासाठी भाजपच्या मनातले नाव काय?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 जून 2017

सकाळ न्यूज नेटवर्क

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - ""आपण ज्या राज्यात पक्षबांधणीसाठी जातो, तेथील सहयोगी पक्षाला भेटतो, त्यामुळे "मातोश्री'भेटीला फारसे महत्त्व देऊ नका,'' असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले असले, तरी शिवसेना मात्र या सदिच्छा भेटीत राष्ट्रपतिपदासाठी भाजपच्या मनातला उमेदवार कोण, हा प्रश्‍न करणार आहे. विरोधी पक्षाने अद्यापपर्यंत कोणतेही नाव पुढे केले नसल्याने सत्तारूढ भाजपशी फटकून वागण्यात अर्थ नाही, असा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे. एकूण 63 आमदार आणि 18 खासदारांच्या बळावर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत वेगळे वागून काहीही साध्य होणार नाही याची कल्पना असल्याने सबुरीचे धोरण हे शिवसेनेचे सूत्र असेल असे समजते. मात्र, त्याच वेळी भाजपचे अमित शहा यांच्या भेटीला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची पार्श्‍वभूमी असल्याने तुमच्या मनातील नाव सांगा, असे मात्र विचारले जाईल असे समजते.

"भाजपच्या मनात शिवसेनेबद्दल काय आहे ते आम्हाला माहीत आहे,' असा टोमणाही शिवसेनेत मारला जात आहे. या भेटीच्या प्रसंगी ठाकरे कुटुंबीयांसमवेत कोण उपस्थित राहणार याबद्दलही उत्सुकता आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""भाजपने त्यांच्या मनात नाव असेल तर ते सांगावे. अर्थात, त्यांच्या पक्षाने अद्याप कोणतेही नाव पुढे आणलेले नाही, त्यामुळे शिवसेनेने पुढे केलेल्या सरसंघचालक मोहन भागवत आणि कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावावर विचार करावा, अशी विनंती शिवसेनेतर्फे केली जाईल असे वाटते.''

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेतील खासदार अनिल देसाई या वेळी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेतील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी या भेटीतील चर्चेचा सूर आणि तपशील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असे स्पष्ट केले आहे. ही भेट रविवारी (ता. 18) सकाळी अकराच्या सुमारास होईल.

Web Title: amit shah bjp news marathi news maharashtra news mumbai news