अमित शहांनी घेतली माधुरी, रतन टाटांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई  - "साफ नियत सही विकास'चा नारा देत 2019 साठी समर्थन मिळविण्याच्या मोहिमेअंतर्गत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची भेट लांबणीवर ढकलली. 

मुंबई  - "साफ नियत सही विकास'चा नारा देत 2019 साठी समर्थन मिळविण्याच्या मोहिमेअंतर्गत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची भेट लांबणीवर ढकलली. 

देशभरातील मान्यवरांच्या भेटीला अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी प्रारंभ केला आहे. शहा यांनी सकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शेलार यांची आई मीनल यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर अमित शहा यांनी रंगशारदा येथे महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यातील नेत्यांशी चर्चेनंतर अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांची भेट घेतली. या वेळी शहा यांनी मोदी सरकारचे निर्णय आणि भाजपच्या कामाची माहिती सादर केली. 

रतन टाटांना "शिवचरित्र' भेट 
कुलाबा येथे दुपारी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनाही भाजप नेत्यांनी समर्थनासाठी गळ घातली. मोदी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करताना टाटा यांनी स्वत: चर्चेत हस्तक्षेप करीत सरकारने जनसामान्यांसाठी सुरू केलेल्या कार्यक्रमांविषयी समाधान व्यक्‍त केले. आज शिवराज्याभिषेक दिन असल्याने रतन टाटा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "शिवचरित्रा'ची प्रतही भेट दिली. 

लतादीदी आजारी; भेट रद्द 
अमित शहा यांचे गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या भेटीचे नियोजन होते. मात्र लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने ही भेट होऊ शकली नाही. पुढील दौऱ्यात भेट घेण्यास नक्कीच आवडेल. आता तब्येतीमुळे भेट शक्‍य नाही, असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.

Web Title: Amit Shah meet Madhuri Dikshit and Ratan Tata