'फेसबुक लाइव्ह चॅट'द्वारे अमित ठाकरे राजकारणात! 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील आदित्य ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून यापूर्वीच राजकारणात दाखल झाले. युवा सेनेच्या बांधणीला त्यांनी सुरवात केली. विद्यार्थी, युवकांच्या प्रश्‍नांवर त्यांनी काही वर्षांत मोर्चे आणि आंदोलनेही केली.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होत आहेत. त्यांच्या "फेसबुक लाइव्ह चॅट'चा एक "प्रोमो' सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. यात अमित यांच्या फेसबुक पेजची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 14) ते मतदारांशी संवाद साधणार आहेत. 

ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील आदित्य ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून यापूर्वीच राजकारणात दाखल झाले. युवा सेनेच्या बांधणीला त्यांनी सुरवात केली. विद्यार्थी, युवकांच्या प्रश्‍नांवर त्यांनी काही वर्षांत मोर्चे आणि आंदोलनेही केली. त्यांच्या पाठोपाठ आता अमित ठाकरे राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. मंगळवारी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण होणार असल्याचे सांगण्यात आले. 

यापूर्वीच्या निवडणुकीत अमित ठाकरे यांनी मनसेच्या काही उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली होती. एकीकडे महापालिका निवडणुकीबाबत पक्षात अनुत्साहाचे वातावरण असताना अमित त्यात कितपत उत्साह आणतात, याबाबाबत उत्सुकता आहे. अमित यांच्या राजकीय प्रवेशाबाबत यापूर्वीही अनेकदा राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले होते; मात्र राज यांनी त्यावर उत्तर न देणेच पसंत केले होते. अमित यांनीही यापूर्वी कधी कोणत्याही व्यासपीठावर राजकीय भाष्य न केल्याने या "लाइव्ह चॅट'द्वारे ते राजकीय प्रश्‍नांवर कशी भूमिका मांडतात, हे पाहणे औत्युक्‍याचे ठरेल.

Web Title: Amit Thackeray entered in politics