तरुणांना पैसे वाटले, दंगलीचं सुनियोजित षड्यंत्र भाजपचं; नवाब मलिकांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nawab Malik

भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याची तयारी केली होती तसेच यामध्ये भाजपचे अनिल बोंडे सूत्रधार होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. जेंव्हा सगळे मार्ग संपतात तेंव्हा भाजप दंगलीचा मार्ग वापरते, मात्र, हे सरकार पाच वर्षे चालेल, ते काही केल्या पडणार नसल्याचं विधान त्यांनी केलं आहे.

हेही वाचा: 'स्वार्थी राजकारणामुळे आदिवासी समाज दुर्लक्षित', मोदींचा काँग्रेसवर निशाणा

ते म्हणाले की, नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमधील घटना पोलिसांनी नियंत्रणात आणल्या आहेत. सगळ्या आरोपींना पोलिसांनी एफआयआर दाखल करुन अटक करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने सुनियोजित पद्धतीने दंगली घडवण्याचं कारस्थान केलं होतं. महाराष्ट्रातील जनतेने हे षड्यंत्र ओळखलं आणि अमरावतीच्या बाहेर काही घडलं नाही आणि घडू दिलं नाही, याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करतो, असं त्यांनी म्हटलंय.

मालेगावमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक केल्याची माहिती आली होती, मात्र तो एमआयएमचा नगरसेवक आहे, राष्ट्रवादीचा नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. या प्रकारचं राजकारण या देशातील जनता कधीच स्विकारणार नाही. याप्रकारचं राजकारण करु नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा: ना रुकेंगे ना थमेंगे...; NCB च्या कारवाईवरून क्रांतीचं नवं ट्विट

भाजपने बंदच आवाहन केलं मात्र त्या आडून दंगली घडवण्याचं कारस्थान त्यांनी केलं. यामध्ये भाजपच्या अनिल बोंडेंनी दंगलीचं षड्यंत्र रचलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान होतं. या दंगलीसाठी काही तरुणांना पैसे वाटले होते. हे मुंबईतून पैसे पाठवण्यात आले होते. हे सरकार अस्थिर व्हावं, यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर तर सुरुच आहे, मात्र, त्यापलिकडे जाऊन आता असे मार्ग वापरले जात आहेत. सगळे पर्याय वापरुन झाल्यावर भाजप दंगलीचं हत्यार वापरतं. मात्र, भाजपने हे समजून घ्यावं, की तुम्ही आम्हाला पैशांनी उखडून टाकू शकत नाही. आम्ही काहीही केलं तरी पाच वर्षे पूर्ण करणारच, असा ठाम दावा त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, आम्ही एनसीबीचा भांडाफोड केल्यानंतर म्हटलं गेलं की ईडी नवाब मलिकांच्या घरी येणार आहे. जरुर यावं. आम्ही घाबरणार नाही. सत्याची लढाई सुरुच राहिल. कॉर्डीलिया ड्रग्ज प्रकरण एनसीबी निपटून टाकण्याचा प्रयत्नात आहे.

loading image
go to top