कोपरीतील‘ॲम्युजमेंट पार्क’मध्ये किलबिल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

नवी मुंबईतील प्रत्येक उपनगरात छोटी-मोठी उद्याने आहेत, ती त्या विभागांमधील मुलांना खेळण्यासाठी आवडती ठिकाणे आहेत. कोपरी गावातील ॲम्युजमेंट पार्कचा त्यामध्ये आग्रक्रमाने समावेश होतो.

वाशी - झोपाळे, घसरगुंडी, कासवाची भव्य प्रतिकृती यामुळे वाशीजवळच्या कोपरी गावातील ॲम्युजमेंट पार्क बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण झाले आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे तर  सकाळ- संध्याकाळ हे उद्यान गर्दीने फुललेले असते. यामध्ये सध्या मोफत प्रवेश देण्यात येतो.

नवी मुंबईतील प्रत्येक उपनगरात छोटी-मोठी उद्याने आहेत, ती त्या विभागांमधील मुलांना खेळण्यासाठी आवडती ठिकाणे आहेत. कोपरी गावातील ॲम्युजमेंट पार्कचा त्यामध्ये आग्रक्रमाने समावेश होतो. यामध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारण्याकरिता महासभेत ठराव संमत झाला असला तरी अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही दिवसांत ही गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

कसे आहे ॲम्युजमेंट पार्क?
वाशीजवळच्या कोपरी गाव सेक्‍टर- २६ येथे सव्वाचार कोटी रुपये खर्च करून अद्ययावत अशा ॲम्युजमेंट पार्कची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये महाकाय प्रतिकृती आहे. ती पाहण्यासाठी लहान मुलांची व पालकांची नेहमीच गर्दी होते. अन्य खेळणीही लहान मुलांना आकर्षित करतात.

‘ॲम्युजमेंट पार्क’मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. मुलांनाही हे ठिकाण आवडते. विशेष म्हणजे हे पार्क निःशुल्क आहे.
- सचिन पाटील, पालक

शाळेची सुट्टी लागल्यामुळे पार्कमध्ये खेळण्यासाठी येतो. कासव प्रतिकृतीमधील असणारी घसरगुंडी खूप आवडते. 
- हर्ष भोईर, विद्यार्थी

Web Title: Amujment Park in Kopari