Andheri ByElection: अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान; ६ नोव्हेंबरला निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri By Poll Election

Andheri ByElection: अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान; ६ नोव्हेंबरला निकाल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान झालं. मतदारांनी निरुत्साह दाखवल्यानं मतदानाची टक्केवारी खूपच कमी राहिली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २८.७७ टक्केच मतदान झालं होतं पण त्यानंतर मतदान काहीशी वाढ झाली. (Andheri By Election 66.63 percent voting result of Poll will be on November 6)

आज सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरूवात झाली होती. अंधेरी पूर्वेला सर्व २५६ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण भाजपनं निवडणुकीतून माघार घेतल्यानं या निवडणुकीचं महत्व कमी झालं होतं. अनेक मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचा परिणाम हा मतदानाच्या आकडेवारीवरही दिसून आला.

मतदारांची मतदानाला पाठ पण सुट्टी केली एन्जॉय

अंधेरी पूर्व पोट निवडणुकीच्या निमित्तानं एकूण सात उमेदवार रिंगणात होतं. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय हा भाजपच्या माघारीमुळे सोपा झाला. आज सकाळपासूनच अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी अतिशय धीम्या गतीने मतदान झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंतही या आकड्यात विशेष भर पडली नाही. अवघे १६.८९ टक्के मतदान दुपारपर्यंत झाले. तर दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा असताना ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के तर ५ वाजेपर्यंत अवघे २८.७७ मतदान झाले. मतदानाच्या दिवशी या भागातील मतदारांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करूनही या मतदानाला कमी प्रमाणात लोक उतरल्याचे मतदानाच्या आकेडवारीवरून दिसून आले. अनेक मतदारांनी आयती सुट्टी लक्षात घेऊन मतदानापेक्षा आयती सुट्टी घेण्यासाठीच समाधान मानल्याचे चित्र होते.

६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

दुसरीकडे मतदानाच्या निमित्ताने नोटाचा पर्याय वापरण्यात येणार असल्याची तक्रार ही ऋतुजा लटके यांच्याकडून करण्यात आली होती. परंतू नोटाचाही फारसा परिणाम टक्केवारीवर दिसून आला नाही. परंतू नेमकी नोटाची आकडेवारी ही येत्या दिवसात स्पष्ट होईल. आज मतदान झाल्यानंतर संपूर्ण मतांची मोजणी येत्या ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.