अनिल कपूरच्या स्टंटवर रेल्वे फिदा!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

‘मिस्टर इंडिया‘ला सुरक्षा मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण

‘मिस्टर इंडिया‘ला सुरक्षा मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण
मुंबई - लोकलच्या दारात लोंबकळत, दंड फुगवून दाखवत "24‘ या मालिकेची प्रसिद्धी करण्याची कल्पना अभिनेता अनिल कपूरच्या सुपीक डोक्‍यात आली. नेहमीच्या मनमौजी स्वभावानुसार त्याने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान असा प्रवासही केला. "मी कॉलेजला जायचो तेव्हा चालती लोकल पकडत असे आणि चालत्या लोकलमधूनच उतरत असे‘ अशी प्रौढी मिरवताना त्याला सुरक्षा नियमांचेही भान राहिले नाही. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेच्या आरपीएफने त्याला समज देणारी नोटीस बजावली आहे; पण सह मुख्य सुरक्षा आयुक्तांनी त्याला आपल्या सुरक्षा मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे!

अनिल कूपरची गाजलेली "24‘ ही मालिका दुसऱ्या टप्प्यात टीव्हीवर झळकणार आहे. या मालिकेच्या प्रसिद्धीकरता अनिलने गुरुवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान लोकलमधून प्रवास केला. चाहते व प्रसारमाध्यमांच्या गराड्यात हा प्रवास सुरू झाला; पण लोकलच्या दारात उभे राहून हवा खाण्याची फुरफुरी त्याला शांत बसू देईना. तो दारातल्या दांड्याला धरून लोंबकळू लागला. सगळ्या वृत्तवाहिन्यांवर त्याची ही "हिरोगिरी‘ शंभरेक वेळा दाखवण्यात आली. दिवसभर ट्‌विटरवरही त्याच्या या मनमौजीची चर्चा सुरू होती. सेलिब्रिटींच्या या वागण्यातून तरुणांनाही हे दुःसाहस करावेसे वाटेल, अशी टीकाही झाली.
या घटनेची पश्‍चिम रेल्वेचे महानिरीक्षक- सह मुख्य सुरक्षा आयुक्त उदय शुक्‍ल यांनी दखल घेतली; पण अनिल कपूर हा रेल्वेचा नियमित प्रवासी नव्हता, अशी पुष्टीही जोडली. "हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने त्यांना "समज‘वजा नोटीस पाठवण्यात आली आहे; पण लोकलच्या फूटबोर्डावरून जीवघेणा प्रवास करू नये, यासाठी आरपीएफच्या मोहिमेत त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे,‘ असे शुक्‍ल यांनी सांगितले.

अनिलच्या धावत्या लोकलमधून बाहेर डोकावण्याची आरपीएफने गंभीर दखल घेतली आहे. "मालिकेच्या प्रसिद्धीसाठी लोकलचा वापर करण्यासाठी परवानगी घेतलेल्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीकडून सुरक्षेचे नियम पाळण्यात आले नाहीत,‘ असे पश्‍चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले. आरपीएफने 15 दिवसांत 2 हजार 809 प्रवाशांवर दारात लोंबकळल्याप्रकरणी कारवाई केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आयआरसीटी वेबसाईटवर गैरव्यवहार
ई-तिकिटे काढण्यासाठी "आयआरसीटी‘च्या वेबसाईटचा देशभरात 60 टक्के वापर होत असला तरी ती फुलप्रूफ नाही, असे पश्‍चिम रेल्वेचे महानिरीक्षक सह-मुख्य सुरक्षा आयुक्त उदय शुक्‍ल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. "या बेबसाईटवर अनधिकृतरीत्या स्पीड सॉफ्टवेअर वापरून दलाल पैसे कमावत आहेत. वापीला आम्ही अशा दलालांची टोळी पकडली. 51 लाख 23 हजार 158 रुपयांची तिकिटे जप्त केली. हे दलाल गरजू प्रवाशांना ऑनलाईन तिकिटे न मिळता त्यांना प्रतीक्षा यादीत दाखवतात‘ अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Anil Kapoor's stunt Railway Madness