क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्राणी-पक्ष्यांचा काळाबाजार सुरुच

tortoise
tortoise

मुंबई : आठवड्याभरापूर्वीच महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि वनविभागाची कारवाई होऊनही कॉफ्रर्ड मार्केटमध्ये प्राणी-पक्ष्यांचा काळाबाजार सुरु आहे. शुक्रवारी क्रॉफर्ड मार्केटमधून केंद्राच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग व राज्य वनविभागाच्या शिकारप्रतिबंधक विभागाच्या कारवाईत इंडियन रुफ टर्टल या प्रजातीचे वीस संवर्धित कासव व एक पोपट हस्तगत झाला आहे.

वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) आणि सर्प या प्राणीप्रेमी संस्थेच्या नऊ स्वयंसेवकांसह ही कारवाई करण्यात आली. या संस्थेतील एक सदस्य बोगस कस्टमर बनला इतर स्वयंसेवक पहारा ठेवून होते. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि शिकारप्रतिबंधक विभाग या घटनेचा मागोवा घेत होते.

दुपारी अडीचच्या सुमारास कासवांची विक्री करणारा इसम क्रॉफर्ड मार्केटमध्ये आल्यानंतर स्वयंसेवकांनी त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी क्रॉफर्ड मार्केटमध्येच राहणारा असल्याने त्याच्या साथीदारांकडून स्वयंसेवकांना धक्काबुक्की झाली. प्रसंगावधानता राखत स्वयंसेवकांनी नजीकचे पोलिस गाठले. तोपर्यंत वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि शिकारप्रतिबंधक विभागाचे वनाधिकारी पोलिस ठाण्यात हजर झाले. वनअधिका-यांच्या टीमने आरोपी बिलाल शेख (29) ला ताब्यात घेतले. बिलालच्या घराची तपासणी घेतली असता भारतीय प्रजातीचे पोपटही आढळून आले. इंडियन रुफ टर्टल या प्रजातीचे कासव हे भारतीय वन्यजीव कायदा 1972 नुसार पहिल्या श्रेणीत संवर्धित असल्याने बिबालला तीन ते सात वर्षांच्या कारावासाची आणि दहा हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. भारतीय पोपट पाळल्यास पंचवीस हजारांच्या दंडाची तरतूद आहे. आरोपी बिलाल शेख विरोधात वन्यजीव संवर्धन कायदा 1972 नुसार कलम 9, 39,48(अ), 49, 49(अ), 50, 51 कलम लावण्यात आले आहेत. आज आरोपीला किल्ला कोर्टात हजर केले जाईल. ही कारवाई केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एम मारंको यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत राज्य वनविभागाच्या शिकार प्रतिबंधक विभागाचे मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज गीते सहभागी होते. डब्ल्यूडब्ल्यूएया प्राणीप्रेमी संस्थेचे ओमकार कोळेकर, निखिल महाजन, तुषार भोगले, स्वप्निल वीर, कुनाल हाबदे तर अनुज खानविलकर, अरबाज खान, अकबर शेख, सोमेश पुजारी हे स्वयंसेवक सहभागी होते.

कासवांच्याबाबतीत समजल्यानंतर आम्ही आरोपीच्या घरात तपासणी केली असता पोपटही आढळले. या वाढत्या घटना लक्षात घेत बाजारांत सीसीटीव्ही कॅमेरे लावायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, ठाणे, कल्याण आदी रेल्वे स्थानकांवर वनविभागाने तपासणी केंद्र उभारावे.
- सुनीश कुंजू, मानद वन्यजीव रक्षक, मुंबई शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com