फायली गायबप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या फायली चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासण्यात येणार आहे.

मुंबईतील दहिसर येथे सामाजिक न्याय विभागाची इमारत आहे. त्या इमारतीत पूर्वी महामंडळाचे कार्यालय होते. मंडळाचे सर्व अहवाल तेथेच ठेवण्यात आले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पाच अनोळखी व्यक्तींनी कार्यालयाचे टाळे तोडून काही फायली नेल्याचा संशय आहे. संशय येऊ नये म्हणून तेथे नवीन टाळे लावण्यात आले होते. त्याची माहिती एका सामाजिक संस्थेने दहिसर पोलिसांकडे लेखी अर्जाद्वारे कळवली. हा प्रकार संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्हीची पाहणी केली. सीसीटीव्ही चित्रीकरणात पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. त्यानुसार दहिसर पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्या मजल्यावरील टाळे काही जणांनी बदलले आहे. नेमक्‍या किती फायली गायब झाल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या पाच जणांची ओळख पटवण्यात येत आहे. 

Web Title: Anna Bhau Sathe Vikas Mahamandal files issue