esakal | पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर

जगभरात कोरोनाच्या महामारीचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. हा आजार होण्याच्या भीतीने किंवा त्याचा जास्त विचार केल्याने लोकांच्या मनावर परिणाम होत आहे

पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवामुंबई : जगभरात कोरोनाच्या महामारीचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. हा आजार होण्याच्या भीतीने किंवा त्याचा जास्त विचार केल्याने लोकांच्या मनावर परिणाम होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी हेल्पलाईन क्रमांकांवर येणारे कॉल वाढले आहेत. मागील दोन महिन्यांत मुंबई महापालिकेच्या 'हितगूज' हेल्पलाईनवर 2000 हून अधिक कॉल आले. त्याआधी 24131212 या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज 20 हून अधिक कॉल येत होते. मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून ही संख्या दिवसाला 35 वर पोहोचली असून, कोरोनाशी संबंधित चिंतेचे किमान 10 कॉल दररोज येतात, असे सांगण्यात आले. 

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

कोरोना विषाणूसंसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी हालचालींवर निर्बंध आल्यामुळे लोकांमध्ये चिडचिडेपणा आणि रागाचे प्रमाण वाढत आहे. कोरोना महामारीमुळे मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महापालिकेने 1800120820050 या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर दोन महिन्यांत 45 हजार कॉल नोंदवले आहेत. एप्रिलमध्ये राज्य सरकार आणि महापालिका यांच्या सहकार्याने आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या पुढाकाराने 'एमपॉवर वन ऑन वन' सुरू केले. तेथेही कोरोना, सुरक्षितता, घराबाहेर पडणे, नोकरी, प्रवास, कामाच्या ठिकाणीचे वातावरण याबाबत चिंता व्यक्त करणारे कॉल मोठ्या प्रमाणात आले. 

MMRDA चं दुसरं कोविड रुग्णालय तयार; कोरोना रुग्णांना मिळतील 'या' सुविधा.. 

कुटुंब आणि मित्राबाबतच्या प्रश्नांचे प्रमाणही लक्षणीय होते. कॉल करणाऱ्यांपैकी 52 टक्के जणांनी चिंताग्रस्त असल्याचे सांगितले. 22 टक्के व्यक्तींनी विलगीकरणाशी संबंधित समस्या मांडल्या आणि 11 टक्के लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसली. 5 टक्के नागरिकांनी झोपेसंबंधी तक्रारी केल्या, तर 4 टक्के लोकांनी मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. या दोन्ही हेल्पलाईनवर आलेले सर्वाधिक कॉल 25 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे होते.

औषधांवर निर्बंध
मानसोपचारतज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधे अनेकदा नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याखालील आणि शेड्यूल-10 औषधांच्या श्रेणीत येतात. त्यामुळे अनेक औषध दुकाने डिजिटल प्रिस्क्रिप्शनवरून अशी औषधे देत नाहीत. औषधे न मिळाल्यामुळे रुग्णांमध्ये चिंता, औदासीन्य आणि नैराश्याचे प्रमाण वाढल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. बर्‍याचदा दुरुपयोग होत असल्यामुळे ही औषधे लिहून देण्यावर अनेक निर्बंध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...


हेल्पलाईनवरील कॉल

23 मार्च ते 31मे : 925
1 ते 17 जून : 363 
कोव्हिडशी संबंधित : 50 ते 60 टक्के

साधारण कॉलपेक्षा कोव्हिडबाबत चिंता, समस्या सांगणाऱ्या कॉलमध्ये 50 ते 60 टक्के वाढ झाली आहे. वाढती बेरोजगारी, व्यवसायाचे नुकसान, कोरोनाची भीती यामुळे मानसिक आजार वाढले आहेत. संसर्ग होण्याच्या भीतीमुळे नागरिक कार्यालयात जाण्यासही कचरत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना सकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात. 
- डॉ. अमेय आंगणे, सहायक प्राध्यापक, मनोविकृती विभाग, केईएम रुग्णालय

लोक घरी बसून निराश होत आहेत. सोशल मीडियावरील नकारात्मक आणि खोट्या बातम्यांमुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. अनेक तरुण घरात राग व्यक्त करतात; त्यामुळे तणाव वाढतो. 
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ

loading image
go to top