वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

Medical-Exam
Medical-Exam

मुंबई : येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले. मात्र, कोरोनाच्या बिकट परिस्थितीत परीक्षा घेतल्यास रुग्णसेवा करत असलेले डॉक्टर हे आरोग्यसेवेतून बाहेर पडल्यास राज्यातील आरोग्यसेवा विस्कळीत होईल. यातून कोरोना रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे विद्यार्थी हिताबरोबरच रुग्ण हिताचा विचार करून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत सूट देण्यात यावी, अशी विनंती केईएम मार्डकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असून, लॉकडाऊन शिथिल केल्याने रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यातील स्थिती फारच बिकट आहे. तसेच नागरिक आपापल्या गावी जात असल्याने ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांवर ताण पडत आहेत. अनेक खासगी डॉक्टरांना रुग्णसेवेत सामावून घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 

अशा परिस्थितीत रुग्णसेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्यास रुग्णसेवेतून तब्बल दोन हजारपेक्षा अधिक डॉक्टर बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डॉक्टर बाहेर पडल्यास उर्वरित आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान दोन महिने वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी राखून ठेवलेल्या हक्कांच्या सुट्ट्यांवर गदा येणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑगस्टपेक्षा जास्त लांबणीवर ढकलल्यास त्यांची सुपर स्पेशालिटीची पात्रता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून परीक्षेचा घालण्यात आलेल्या घोळामुळे रुग्णसेवेवर होणारा परिणाम लक्षात घेत रुग्णहिताबरोबरच विद्यार्थी हित लक्षात घ्यावे, अशी विनंती करत परीक्षा रद्द करण्याची विनंती निवासी डॉक्टरांनी विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांना केईएम मार्डकडून पत्राद्वारे केली आहे.

म्हणून परिक्षा रद्द करा...
परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून एमसीएला पत्रव्यवहार करावा व ते जर शक्य नसल्यास इंटरनल असेसमेंट आणि दर सहा महिन्यांनी पाठवल्या जाणारा प्रोग्रेस रिपोर्ट, इंटरनल एक्झामिनेशनच्या आधारे या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या गोंधळातून मुक्त करावे. त्यांचा कोरोनाच्या रुग्णसेवेत उपयोग करून घेतल्यास प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांवरील  ताण कमी होईल तसेच या निवासी डॉक्टरांमध्ये संक्रमणाचे प्रमाण पाहता या मनुष्यबळाचा यथोचित वापर होऊन संक्रमणाचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात येईल.

प्रथम आणि द्वितीय वर्षांचे प्रबंधही रद्द करा..
प्रथम व द्वितीय वर्षांचे अभ्यासक्रम रखडलेले आहेत, पूर्णवेळ कोरोना रुग्णसेवेत असल्यामुळे त्यांना प्रबंधासाठी वेळ काढणे दुरापास्त झाले आहे. प्रबंधासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य होणार नाही व सदर परिस्थिती डिसेंबरपर्यंत आटोक्यात येणार नसल्याची शक्यता वाटत असल्याची विद्यापीठाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामुळे असल्यामुळे विद्यापीठाने सारासार विचार करून या प्रथम व द्वितीय वर्षांचे प्रबंध सरसकट रद्द करण्याची मागणी केईएम मार्ड कडून विद्यापीठाला व सरकारला करत आहोत, अशी माहिती मार्डच्यावतीने देण्यात आली.

पालिकेच्या मार्ड अध्यक्षांनी ही भूमिका घेतली आहे. सेंट्रल मार्डने याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. परिक्षा रद्द करण्याबाबत केईएम, सायन आणि नायर हा प्रमुख रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांनीची भूमिका आहे. शिवाय, अंबेजोगाईच्या रुग्णालयातून ही भूमिका घेण्यात आली आहे. पालिका रुग्णालयातच सर्वाधिक रुग्ण आहेत. डॉक्टरांची संख्या कमी असूनही सर्वांनाच सर्व प्रकारची कामे करावी लागत आहेत. त्यात डॉक्टर्स अभ्यास करण्याच्या मनस्थितीत नाहीत. हे लक्षात घेऊन परिक्षा सरसकट रद्द कराव्यात किंवा या डॉक्टरांना रुग्णसेवेत सामावून न घेता किमान 45 दिवस परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी देण्यात यावे. 
- डॉ. दिपक मुंढे, अध्यक्ष, मार्ड, केईएम रुग्णालय.


आम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी 45 दिवसाचा कालावधी मिळावा अशी आमची भूमिका आहे. प्रशासन आणि त्याबाबत डीएमईआर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आता परीक्षेच्या वेळापत्रकानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल. 
- डॉ. राहुल वाघ, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com