एपीएमसीचे प्रश्‍न निकाली काढणार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटला भेडसावणारे प्रश्‍न भविष्यात सुटतील, असे आश्‍वासन विद्यमान आमदार आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिले.

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटला भेडसावणारे प्रश्‍न भविष्यात सुटतील, असे आश्‍वासन विद्यमान आमदार आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिले. विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर म्हात्रे यांनी एपीएमसी मार्केटचा दौरा केला. या दौऱ्यात म्हात्रेंनी व्यापाऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. यावेळी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सर्व माथाडी व व्यापाऱ्यांनी म्हात्रे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.  

यावेळी म्हात्रेंनी त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत एपीएमसीचे सर्वाधिक जास्त प्रश्‍न सोडवणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार असल्याचे कौतुकोद्‌गार कांदा बटाटा मार्केटमधील अडत व्यापारी संघटनेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काढले. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करीत आहोत, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी मंदा म्हात्रे यांचा व्यापाऱ्यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाला नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, एपीएमसी अडत व्यापारी संघटनेचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, अध्यक्ष राजू शेळके उपस्थित होते.

आपल्या मागील कारकिर्दीत आमदार म्हात्रे यांनी आमचे प्रश्‍न सोडवले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करीत आहोत. 
-चंद्रकांत पाटील, नेते, अडत व्यापारी संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: APMC queries will be resolved!