एके 56 रायफलसह शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अत्याधुनिक एके 56 या रायफलसह तीन मॅगेझीन आणि 108 जिवंत काडतुसांसह दोन पिस्तूल असा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मुंबईतील बांगूरनगर येथील घरातून हस्तगत केला.

ठाणे : ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अत्याधुनिक एके 56 या रायफलसह तीन मॅगेझीन आणि 108 जिवंत काडतुसांसह दोन पिस्तूल असा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मुंबईतील बांगूरनगर येथील घरातून हस्तगत केला. याप्रकरणी डॉन दाऊद इब्राहीम टोळीतील कुख्यात गुंड छोटा शकीलचा हस्तक नईम खान याच्या पत्नीसह दोघा ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आणखी खुलासा होण्याची शक्‍यता आहे. 

ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, 5 जुलैला पथकाने राबोडी येथे सापळा रचून सायकलवरून कोकेन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या जाहीदअली काश्‍मिरी (47) आणि संजय बिपीन श्रॉफ (47, दोघेही रा. नागपाडा, मुंबई) यांना अटक केली होती. त्यांच्या झडतीमध्ये 10 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ आढळला होता.

यातील काश्‍मिरी याच्या चौकशीत मुंबईतील एका घरात शस्त्रास्त्रांचा साठा असल्याचा सुगावा लागल्याने पथकाने मुंबईतील गोरेगाव पश्‍चिमेकडील बांगूरनगर येथील नईम खान याच्या घरी छापा मारून एक अत्याधुनिक एके 56 रायफलसह तीन मॅगझीन व 95 जिवंत काडतुसे तसेच नऊ एमएमची दोन पिस्तूल व 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आला. 

Web Title: arms with AK 56 rifle seized