अर्णब गोस्वामी: पहिल्यांदाच ११ वाजेपर्यंत सुरु होतं अलिबाग कोर्ट

पूजा विचारे
Thursday, 5 November 2020

बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता. विशेष म्हणजे एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी रात्री उशिरापर्यंत अलिबाग येथील कोर्ट सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ होती. 

मुंबईः  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर दुपारी अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं.  अर्णब यांना आता 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. बुधवारी सकाळी अटक केल्यानंतर दुपारी अर्णब यांना 1 वाजण्याच्या सुमारास अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. 

मुंबई पोलिस आणि रायगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले होते. आपल्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा अर्णब यांनी कोर्टात केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.  त्यानुसार वैद्यकीय तपासणी झाली आणि आता कोर्टाने अर्णब यांना 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही अटक केली आहे. अर्णब यांना बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर केलं. हजर केल्यानंतर अर्णब आणि इतर दोन आरोपींना पोलिस कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद सुरु झाला.

अधिक वाचाः  अन्वय नाईक यांना सरकारकडून न्याय: सचिन सावंत

बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता. विशेष म्हणजे एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी रात्री उशिरापर्यंत अलिबाग येथील कोर्ट सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ होती. 

या युक्तीवादाच्या वेळी अर्णब गोस्वामींच्या वतीने वकील गौरव पारकर, फिरोज शेख यांच्यावतीने वकील निहा राऊत तर नितेश सारडा यांच्यावतीने वकील सुशील पाटील यांनी बाजू मांडली. सरकारी अभियोक्ता म्हणून वकील रुपेश महाकाळ यांनी काम पाहिलं. 

कोर्टाकडून अर्णब गोस्वामींना समज

गोस्वामी कोर्टात गेले, तिथे तेव्हा त्यांनी काही हातवारे केले. तसंच त्यावेळी ते इशारे ही करत होते. गोस्वामी यांचे हातवारे बघून आणि त्यांचं हे वर्तन बघून न्यायाधीश चांगलेच भडकले. त्यांनी लगेचच गोस्वामी यांना समज देत, तुम्ही आधी नीट उभे राहा, हातावारे करु नका, असं म्हटलं.

न्यायाधीशांनी समज देताच अर्णब गोस्वामी यांचं न्यायालयातील वागणं बदललं आणि ते शांत सुनावणी ऐकत होते. दरम्यान गोस्वामी यांना मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला.  पोलिसांकडून कोर्टात अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टाने ती फेटाळली. 

अधिक वाचाः  तुम्ही आधी नीट उभे राहा; हातवारे करु नका, कोर्टानं अर्णब गोस्वामींना खडसावलं

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागमध्ये दाखल एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करत पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर आज दुपारी ३ वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. तिथेही अर्णब यांच्यावतीने जामीन अर्ज केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

Arnab Goswami hearing Alibagh court Was opened till 11 pm for the first time


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswami hearing Alibagh court Was opened till 11 pm for the first time