अन्वय नाईक यांना सरकारकडून न्याय: सचिन सावंत

कृष्ण जोशी
Thursday, 5 November 2020

अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून भाजपकडून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे, असे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

मुंबईः अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून भाजपकडून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे, असे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

दोन वर्ष या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. या कुटुंबावर प्रचंड दबाव आणला गेला, त्यांना धमकवण्यात आले. त्यांना धमकावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. 

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठीत गोस्वामी यांचे नाव असूनही दोन वर्षात या प्रकरणावर फडणवीस सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणात गोस्वामी यांचा जबाब अलिबागला नाही तर मुंबईत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात नोंदवण्यात आला, एवढी खास वागणूक कशासाठी दिली. पीडित कुटुंबाला संरक्षण दिले नाही, गोस्वामी यांच्या मागे ताकदवान लोक आहेत असे सांगण्यात आले. याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे, असेही सावंत यांनी सांगितले.

अधिक वाचाः  तुम्ही आधी नीट उभे राहा; हातवारे करु नका, कोर्टानं अर्णब गोस्वामींना खडसावलं

गोस्वामी यांच्या अटकेचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी निषेध केला आहे. खरे तर देशाचे गृहमंत्री म्हणून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना हे प्रकरण दडपण्यात आले आणि आता ते गोस्वामी यांची बाजू घेत आहेत हे दुर्दैवी आहे. एक मराठी परिवार उध्वस्त होत असताना महाराष्ट्रातील भाजपाचे नेते अर्णब गोस्वामींच्या मागे जात असतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेला सहन होणारे नाही, असेही त्यांनी दाखवून दिले.

अधिक वाचाः  खोपोलीत फार्मा कंपनीला लागलेली भीषण आग तीन तासानंतर आटोक्यात, दोघांचा मृत्यू

भाजपला याच प्रकरणात गळा काढण्याचे काहीच कारण नाही. कारण मोदी सरकारने यापूर्वीही पत्रकारांवर कारवाई केली आहे. भाजप समर्थक आणि विरोधक यांच्यासाठी दोन वेगवेगळे कायदे आहेत का याचे उत्तर त्यांनी द्यावे. सुशांतसिंह प्रकरणात सुसाईड नोट नसूनही तत्परतेने सीबीआयने तपास हाती घेतला. तर नाईक प्रकरणी सुसाईड नोट असूनही प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाले. राज्य सरकारने केलेली कारवाई ही पुरोगामी महाराष्ट्राची न्याय भूमिका आहे, असे सावंत म्हणाले.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Government justice Anvay Naik Congress spokesperson Sachin Sawant


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government justice Anvay Naik Congress spokesperson Sachin Sawant