वाशी बाजारात सीताफळाची आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सीताफळाचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने बाजारात आता मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. घाऊक बाजारात सध्या सीताफळाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होत असून, प्रतिदिन पाचशे ते सातशे क्विंटल आवक होत आहे.

नवी मुंबई : सीताफळाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी बाजारात आता उशिराने का होईना, सीताफळाचा मुख्य हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात आता मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. वाशीतील घाऊक बाजारात सध्या चांगल्या प्रमाणात सीताफळ येत आहेत, शिवाय त्यांचे दरही आवाक्‍यात असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्यांचा आस्वाद घेता येत आहे.

घाऊक बाजारात सध्या सीताफळाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होत असून, प्रतिदिन पाचशे ते सातशे क्विंटल आवक होत आहे. हे सीताफळ नाशिक, जुन्नर, नगर, कर्नाटकमधून येत आहेत. या वर्षी सीताफळाची आवक काहीशी उशिराने सुरू झाली आहे. मात्र, आता आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. यापुढेही ही आवक अशीच वाढत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आवक समाधानकारक असल्याने सीताफळाचे दरही आवाक्‍यात राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या घाऊक बाजारात उच्च प्रतीचे सीताफळ ८० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर त्या खालोखाल असणारे सीताफळ ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहेत. दर नियंत्रणात असल्याने ग्राहकांचीही त्यांना विशेष मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ बाजारातही उच्च प्रतीचे सीताफळ शंभर ते दीडशे रुपये किलो, तर त्या खालोखाल असणारे सीताफळ ८० ते १०० रुपये किलो दराने मिळत आहेत. आवक चांगली असल्याने सध्या खाण्यासाठी आणि त्याचबरोबर आईस्क्रीम कंपन्यांकडूनही सीताफळांना मागणी आहे.

दिवाळीपर्यंत दर नियंत्रणात राहणार 
दिवाळीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सीताफळ बाजारात येतात. त्यावेळी त्यांचे दरही खाली आलेले असतात. त्यामुळे आता दिवाळीपर्यंत ही आवक अशीच सुरू राहणार असून, दरही नियंत्रणात राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrival of custard apple increased in Vashi market