ठाण्यातील "गल्ली बॉय'साठी आर्ट स्टुडिओ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

ठाणे शहरातील "गल्ली बॉय' यांना व्यापक व्यासपीठ देण्यासाठी "गल्ली आर्ट स्टुडिओ' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या कलाकार मुला-मुलींना विविध संस्थांच्या माध्यमातून नृत्य, अभिनय व संगीत शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठाणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक मुला-मुलींना कलागुणांना मुरड घालावी लागते. या मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. शहरातील "गल्ली बॉय' यांना व्यापक व्यासपीठ देण्यासाठी "गल्ली आर्ट स्टुडिओ' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या कलाकार मुला-मुलींना विविध संस्थांच्या माध्यमातून नृत्य, अभिनय व संगीत शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठाणे शहरातील सुमारे 52 टक्के नागरिक झोपडपट्टी भागात राहत असून, त्यामध्ये 18 वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे 18 हजार इतकी आहे. त्यापैकी बहुतांश मुले पालिका शाळेत शिक्षण घेतात. मात्र, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या समाजकल्याण विकास विभागाने अशा मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "गल्ली आर्ट स्टुडिओ'च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

या माध्यमातून 18 वर्षांखालील मुलांना नृत्य, अभिनय व संगीत शिकवले जाणार आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते आठ महिने आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड निविदा प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे. या संस्था झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलांमधील अंगभूत कलागुण ओळखून, त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करणार आहेत. या मुलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

नऊ प्रभागांसाठी प्रत्येकी 25 लाखांचा खर्च 
प्रकल्पाचे व्यवस्थापन, नियंत्रण, मूल्यमापन, संकलन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे. ठाणे पालिका क्षेत्रातील प्रभाग समितीनिहाय नऊ "गल्ली आर्ट स्टुडिओ'ची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पालिका शाळेच्या जागा शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नृत्य, अभिनय व संगीत यासाठी प्रत्येकी 25 लाखांचा खर्च पालिकेकडून केला जाणार आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Art studio for Galli Boy in Thane