पालघरमधील कला शिक्षकाने जपली सामाजिक बांधिलकी, चित्राच्या मोबदल्यातून दिला मदतनिधी

प्रकाश पाटील
Friday, 23 October 2020

चित्राचा मोबदला म्हणून अनेकांनी काही रक्कम माळी यांच्याकडे स्वखुशीने दिली. हीच रक्कम जमवून माळी यांनी ती कृतज्ञतेच्या भावनेने मदतनिधीसाठी दिली.

पालघर : कोरोना काळात सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात येत होता. त्या दरम्यान पालघरमधील म. नी. दांडेकर आर्यन शाळेचे कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी अनेक चित्र रेखाटली. या रेखाटलेल्या चित्रांतून त्यांना अनेकांकडून स्वखुशीने मिळालेली रक्कम माळी यांनी कोरोना महामारीच्या आपत्कालीन निधीसाठी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे सुपूर्द केली. 

नक्की वाचा : अनुसूचित जमातीतील सहायक प्राध्यापक पदभरतीत घोटाळा? SC/ST आयोगाने मागविला अहवाल

कोरोना काळात शिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी कोरोना महामारीवर अनेक चित्रे, भित्तिचित्रे, संकल्पचित्रे व रेखाचित्रे रेखाटून समाजात जनजागृती करण्याचे मौलिक कार्य केले. महाराष्ट्रातील काही सामाजिक सेवाभावी संस्थांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यातही त्यांनी सहभाग घेऊन सुयश संपादन केले. लॉकडाऊनच्या काळात अनेकांशी समोरासमोर संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे माळी यांनी आपल्या परिचित व्यक्तींची व विद्यार्थ्यांच्या आठवणीत व्यक्तिचित्रे रेखाटली. रेखाटलेली व्यक्तिचित्रे त्यांनी फेसबुक, व्हॉट्‌सअप व इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. त्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

हे ही वाचा : 'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

दरम्यान, त्यांनी पालघरच्या पंचक्रोशीतील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक तसेच विविध कला-क्रीडा क्षेत्रातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींची रेखाचित्रे रेखाटली. आकर्षक व सुंदरतेने रेखाटलेल्या चित्रांना फ्रेम करून त्या-त्या व्यक्तींना एक प्रेमाची आठवण म्हणून त्यांनी स्वत: घरपोच नेऊन ही चित्रे दिली. त्यामुळे स्वत:चे रेखाचित्र पाहून सर्वांना आनंद झाला. चित्राचा मोबदला म्हणून अनेकांनी काही रक्कम माळी यांच्याकडे स्वखुशीने दिली. हीच रक्कम जमवून माळी यांनी ती कृतज्ञतेच्या भावनेने मदतनिधीसाठी दिली. ज्या समाजाने आपल्या कलेचा मानसन्मान केला त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या कृतज्ञ भावनेतून माळी यांनी कोरोना महामारीच्या आपत्कालीन मदतनिधीसाठी 11 हजार रुपयांची देणगी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे सुपूर्द केली. माळी यांच्या या उदात्त कार्यामुळे पालघर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 

महत्वाची बातमी : आज वर्षा बंगल्यावर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाची बैठक

लॉकडाऊनच्या काळात समाजातील प्रतिभावंत नामवंत व्यक्तींची पेन्सिल स्केचेस मी केली. त्यातून काही दानशूर व्यक्तींनी मी केलेल्या कामाचा मेहनताना मला स्वखुशीने दिला, मिळालेल्या रकमेचा विनियोग सत्कार्यासाठीच करायचा या मताशी मी ठाम होतो. म्हणून कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला मी केलेल्या कलाकृतीतून मिळालेली रक्कम देण्याचे ठरविले. 
- ज्ञानेश्‍वर माळी, चित्रकला शिक्षक. 

(संपादन : वैभव गाटे)

An art teacher from Palghar made a social commitment and donated money


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An art teacher from Palghar made a social commitment and donated money