कळवा-खारीगावात कृत्रिम पाणीटंचाई! 

कळवा-खारीगावात कृत्रिम पाणीटंचाई! 

कळवा : गेल्या वर्षी पाणीटंचाईने हैराण झालेल्या कळवा-खारीगावातील नागरिकांना या वर्षी भरपूर पाऊस पडल्याने दिलासा मिळाला होता. मुसळधार पाऊस पडून बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही स्टेम, एमआयडीसी व ठाणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवाळी सणानंतर पुन्हा एकदा येथील नागरिकांना "पाणीबाणी'ला सामोरे जावे लागत आहे. या पाणीटंचाईने नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा या भागात "पाणीयुद्ध' भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
 
कळवा, खारीगाव, पारसिकनगर या परिसरातील नागरी वस्तीत व कळवा पूर्व, घोळाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर या झोपडपट्टी भागात स्टेम व एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी वितरित होत असते; मात्र दिवाळीपासून नळदुरुस्तीच्या नावाखाली खारीगाव भागात दुपारी 12 वाजता पाणीपुरवठा बंद केला जातो व सायंकाळी 6 नंतर पाणी येते.

पुन्हा चार तासांनंतर रात्री पाणीपुरवठा बंद केला जातो. असे आठवड्यात दोन ते तीन वेळा घडत असल्याने येथील गृहिणींना जेवण आटोपल्यावर भांडी धुवायला पाणी उपलब्ध होत नाही. साथीच्या आजारांचा धोका असल्याने प्लास्टिकच्या टाक्‍यांमध्ये पाणीही साठवता येत नाही. 

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गेल्या वर्षी या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या; मात्र पाणीटंचाई कायम राहिल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समितीवर मोर्चाही काढला होता. त्यानंतर स्टेम व एमआयडीसीने पाणीकपातीचे वेळापत्रक वाटून घेतले.

त्यानंतर पाणीपुरवठा थोड्या प्रमाणात सुरळीत झाला; मात्र या वर्षी भरपूर पाऊस पडूनही ऐन दिवाळीपासूनच स्टेम व एमआयडीसीच्या ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. सत्ताधारी हेतुपूर्वक ही पाणीकपात करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. ही पाणीकपात लवकरात लवकर दूर करावी; अन्यथा रस्त्यावर उतारण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. 

वारंवार चर्चा करूनही पाण्याची समस्या सुटत नसेल, तर या नागरिकांसाठी आम्हाला मोर्चा काढून रस्त्यावर उतरावे लागेल. 
- उमेश पाटील, 
स्थानिक नगरसेवक 

कळवा पारसिकनगर, तसेच घोळाईनगर, भास्करनगर परिसरात पाण्याचे समान वाटप होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. 
- वर्षा मोरे, 
स्थानिक नगरसेविका 

गुरुवार ते शनिवार या कालावधीत एमआयडीसीने दुरुस्तीसाठी पाण्याचे "शटडाऊन' केल्याने ही अडचण आली होती; परंतु आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल. 
- विनोद पवार, 
कार्यकारी अभियंता, 
पाणीपुरवठा विभाग, 
ठाणे महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com